“मतदानयंत्राची (ईव्हीएम) बटणं कचा कचा दाबा…म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल’”, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत केलं होतं. यावर विरोधकांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी याप्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. अजित पवारांच्या वक्तव्यात कुठेही उमेदवाराचा उल्लेख नाही, असं म्हणत निवडणूक अधिकाऱ्यांनी अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी याप्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे तपास अहवाल सादर केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यात व्यस्त आहेत. सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या पक्षाने १७ एप्रिल रोजी इंदापूर येथे वकील आणि डॉक्टरांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले होते की, ‘‘आम्ही केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होईल. पण तुम्हाला फायदा होईल, तेव्हा तो कुणामुळे झाला हे विसरू नका. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देऊ. पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो, त्याप्रमाणे मतदान यंत्राची बटणं कचा कचा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल.”

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी यावर स्पष्टीकरणदेखील दिलं होतं. अजित पवार म्हणाले होते, कोणत्याही गोष्टीत ध चा मा करू नये. मी गंमतीने हसत हसत तिथे बोलत होतो. तिथे सर्वजण वकील आणि डॉक्टर होते. ती जाहीरसभा नव्हती. ती मर्यादित लोकांची, सुशिक्षित वर्गाची सभा होती. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांचे मान्यवर तिथे हजर होते.

हे ही वाचा >> “काँग्रेस पक्ष माझ्यावर कारवाई करू शकेल असं वाटत नाही, कारण…”, विशाल पाटलांना विश्वास

निवडणूक अधिकारी काय म्हणाल्या?

अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर बारामतीच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी प्राथमिक तपास करून एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे. या अहवालात द्विवेदी यांनी अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे. तसेच या अहवालात म्हटलं आहे की, अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यात कुठेही उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही, तसेच कुठेही निवडणूक चिन्हाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे अजित पवारांचं हे वक्तव्य आचारसंहितेचं उल्लंघन नाही.