देशात लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला. आता मंगळवारी ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपामध्ये चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहेत. महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये बारामती, कोल्हापूर, सांगलीसह आदी मतदारसंघाचा समावेश आहे.

कोणत्या मतदारसंघात उद्या मतदान?

तिसऱ्या टप्प्यांसाठी होणाऱ्या मतदानामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या ११ मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. बारामती, कोल्हापूर, सांगलीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून हे मतदारसंघ जास्त चर्चेत राहिले आहेत. या ११ लोकसभा मतदारसंघांसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

हेही वाचा : “काँग्रेसचे सरकार आल्यावर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेऊ”, राहुल गांधींची मोठी घोषणा

कोणत्या मतदारसंघात कोणते उमेदवार?

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांच्याविरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. सांगलीत महायुतीचे संजय काका पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होत आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मध्ये भाजपाचे नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत तर साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, सोलापूरमध्ये भाजपाचे राम सातपुते यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, माढा मतदारसंघात भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील, लातूरमध्ये भाजपाचे सुधाकर श्रृंगारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे शिवाजीराव कलगे, धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर, रायगडमध्ये अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे.

हेही वाचा : ‘आप’ने खलिस्तानवाद्यांकडून निधी घेतला’, नायब राज्यपालांकडून केजरीवालांच्या चौकशीची मागणी

कोणत्या राज्यातील किती मतदारसंघात मतदान

तिसऱ्या टप्प्यांसाठी देशात एकूण ९३ जागांसाठी ७ मे राजी मतदान पार पडणार आहे. यामध्ये १.८८ कोटी पेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील १०, बिहार ५, मध्य प्रदेशातील ९, पश्चिम बंगाल ४, महाराष्ट्र ११, कर्नाटक १४, छत्तीसगड ७, गोवा २, आणि दादार नगर हवेली आणि दमण-दीव- २, गुजरात २५, आसाम ४ अशा एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे.

देशातील प्रमुख लढती कोणत्या?

तिसऱ्या टप्प्यातील ७ मे रोजी होणाऱ्या मदतानामध्ये देशातील काही प्रमुख लढती होणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, डिंपल यादव, अधीर रंजन चौधरी, ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश आहे.