गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ साली निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींसाठी निवृत्तीचा नियम जाहीर केला होता. त्यानुसार ७५ वर्षे वयानंतर संबंधित नेतेमंडळींनी निवृत्त व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यामुळे पुढील वर्षी मोदीही पंच्याहत्तरी पार करत असून ते अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत, असं विधान केजरीवाल यांनी केलं होतं. त्यावरून भाजपाकडून प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता केजरीवाल यांनी आपल्या दाव्याला समर्थन देण्यासाठी काही नवीन मुद्दे मांडले आहेत.
अरविंद केजरीवाल व अखिलेश यादव यांनी आज लखनौमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यालयात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनीही भारतीय जनता पक्षाचा ४०० पारचा नारा पोकळ असल्याची टीका केली. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आधीच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. तसेच, देवेंद्र फडणवीस व योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख केला.
काय म्हणाले अरविंद केजरीवाल?
जर भाजपाचं सरकार आलं तर पुढच्या दोन महिन्यांत योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदावरून हकालपट्टी केली जाईल, असं केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज फेटाळला; कारण काय?
“एक तर यावेळी मोदी स्वत:साठी मतं मागत नसून अमित शाहांना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागत आहेत. दुसरं हे जिंकल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना २ ते ३ महिन्यांत मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाईल. तिसरं म्हणजे एससी-एसटीचं आरक्षण संविधानात दुरुस्ती करून हटवण्यात येईल. चौथं म्हणजे देशभरातून येणाऱ्या आकड्यांवरून हे स्पष्ट होतंय की ४ जूनला इंडिया आघाडीचं सरकार बनणार आहे”, असं केजरीवाल म्हणाले.
“अमित शाह यांना मोदींनी वारस म्हणून निवडलंय”
दरम्यान, मोदींनी अद्याप आपलं विधान फेटाळलं नसल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. “२०१४ साली मोदीजी पंतप्रधान बनले तेव्हा त्यांनी स्वत: एक नियम बनवला होता. भाजपामध्ये व त्यांच्या सरकारमध्ये ७५ वर्षांपेक्षा जास्त कुठली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला संघटनेत किंवा पदावर ठेवलं जाणार नाही. त्यात सर्वात आधी लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना निवृत्त केलं गेलं. त्यानंतर यशवंत सिन्हा, सुमित्रा महाजन अशा अनेकांना तिकिटं मिळाली नाहीत. अनेकांना पदावरून हटवण्यात आलं. आता पुढच्या वर्षी मोदीजी ७५ वर्षांचे होती. त्यानंतर अमित शाह यांना वारस म्हणून निश्चित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे”, असं केजरीवाल म्हणाले.
“गेल्या दोन वर्षांपासून मोदी यावर काम करत आहेत. कारण भाजपामध्ये अमित शाह यांच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या सर्व नेत्यांना हळूहळू हटवण्यात आलं. शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे, डॉ. रमण सिंह यांना हटवण्यात आलं. देवेंद्र फडणवीस, खट्टर यांना संपवण्यात आलं. एकच व्यक्ती उरली आहे जी अमित शाह यांच्या रस्त्यात अडसर ठरू शकते. ती म्हणजे योगी आदित्यनाथ. त्यांना हटवण्याचंही ठरलं आहे. सरकार बनलं तर दोन महिन्यांत योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल”, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
मोदी ७५ वर्षांच्या नियमावर बोलत नाहीत!
“मी दोन दिवसांपूर्वी हे बोलल्यानंतर अमित शाह व भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की मोदी तिसरी टर्म पूर्ण करतील, त्यांनी आधी राजीनामा द्यायला नको वगैरे. त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. पण मोदींनी आत्तापर्यंत हे म्हटलेलं नाही की ते ७५ वर्षं पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होणार नाहीत. त्यांनी स्वत: बनवलेला नियम आहे. नाहीतर लोक म्हणतील मोदींनी आडवाणींना हटवण्यासाठी हा नियम बनवलेला होता. त्यामुळे देशातल्या लोकांना खात्री आहे की मोदी हा नियम स्वत: पाळतील. त्याशिवाय योगी आदित्यनाथ यांना हटवलं जाईल यावर भाजपाच्या कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात येईल हे तर आता निश्चित आहे”, असंही केजरीवाल यांनी यावेळी नमूद केलं.