अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे यांची आज अमरावतीत जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. तसेच आपली पाच वर्षांपूर्वी चूक झाली, पण आता ही चूक सुधारायची आहे, असे विधान करत शरद पवार यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला.
अमरावतीत महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार यांनी केलेल्या या विधानावर प्रहारचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांनी एकदा नाही तर दोनदा चूक केली”, असे म्हणत बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते आज अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.
quiziframe id=30 dheight=282px mheight=417px
हेही वाचा : शरद पवार नागपूरच्या मतदानाबाबत अमरावतीच्या सभेत काय म्हणाले ?
बच्चू कडू काय म्हणाले?
“शरद पवार यांनी एकदा नाही तर दोनदा चूक केली. एवढी मोठी चूक केली की, ती चूक संपूर्ण अमरावतीकरांना भोगावी लागत आहे. एवढ्या मोठ्या माणसाने अशा चूका करु नये. अशा चुका झाल्या तर अडचण होते. मात्र, तरीही शरद पवार यांनी माफी मागण्याची गरज नव्हती. रवी राणा हे विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून पाठिंबा घेऊनच निवडून आले. कारण त्यांना पाठिंब्याशिवाय जमत नाही. आता रवी राणा यांचा पक्ष त्यांच्या पत्नीनेच फोडला, म्हणजे युवा स्वाभीमान पक्ष फुटला आणि त्या भाजपामध्ये गेल्या”, असे म्हणत बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली.
शरद पवार काय म्हणाले होते?
“मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगण्यासाठी आलो आहे. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. कारण माझ्याकडून पाच वर्षांपूर्वी एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा, यासाठी मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना अमरावतीकरांनी खासदार केलं. पण पाच वर्षांचा त्यांचा अनुभव पाहिल्यानंतर मनात अस्वस्थता आली. त्यामुळे कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ही चूक आता पुन्हा कधी होणार नाही. ती चूक आता दुरुस्त करायची आहे”, असे शरद पवार अमरावतीत नवणीत राणा यांच्याबाबत बोलताना म्हणाले.