अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते निलेश लंके यांच्यामध्ये लोकसभेची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांचा सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. यातच प्रचाराच्या सभेत बोलताना सुजय विखे पाटील यांनी मोठे विधान केले आहे. ‘आमच्या नावाची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका’, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सुजय विखे नेमके काय म्हणाले?

“काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका”, असे म्हणत सुजय विखे यांनी भरसभेत हात जोडले. त्यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

सुजय विखे हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदर आहेत. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’, असे आव्हान दिले होते. त्यांचे त्या विधानाचीही मोठी चर्चा रंगली होती. यानंतर आता ‘आमच्या नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे म्हटल्यामुळे सुजय विखे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.