भारतीय जनता पार्टीच्या अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. राणा यांनी गुरुवारी (९ मे) तेलंगणामधील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचार केला. तर आज जहिराबादमध्ये भाजपा उमेदवार बी. बी पाटील यांचा प्रचार केला. या दोन्ही प्रचासभांमध्ये राणा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वादाला सुरुवात झाली आहे.
नवनीत राणा यांनी हैदराबादच्या सभेत स्थानिक खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. राणा म्हणाल्या, छोट्या भावाने १५ मिनिटांसाठी पोलीस बाजूला करायला सांगितलं होतं. मी आज त्या दोघांना सांगू इच्छिते, छोट्या (असदुद्दीन ओवैसी यांचे धाकटे बंधू अकबरुद्दीन ओवैसी) तुला १५ मिनिटं लागत होती. पण आम्हाला केवळ १५ सेकंद लागतील. १५ सेकंदांसाठी पोलिसांना बाजूला केलं तर छोट्या भावाला समजणारही नाही, कोण कुठून आले आणि कुठे गेले.
दरम्यान, नवनीत राणा यांनी आज जहिराबादमध्ये बी. बी. पाटील यांच्या प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीतही केली. राणा म्हणाल्या, आमचे भारतीय जनता पार्टीचे जहीराबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बी. बी. पाटील यांच्या प्रचारासाठी मी इथे आले आहे. आम्ही गेल्या पाच वर्षांपासून संसदेत एकत्र काम करत आहोत, त्यामुळे मी त्यांना पाच वर्षांपासून ओळखते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला आहे. त्या ४०० जागांमध्ये जहीराबादची एक जागा नक्कीच असेल. कारण बी. बी. पाटील यांनी ज्या प्रकारे त्यांच्या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून काम केलंय ते पाहता ते सहज ही लोकसभा निवडणूक जिंकतील.
नवनीत राणा म्हणाल्या, मला इथल्या मतदारांना एक गोष्ट सांगायची आहे. काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे. या गोष्टीला विरोध करण्यासाठीच मी इथे आले आहे. तसेच भाजपाचे उमेदवार बी बी पाटील यांच्या प्रचारासाठी मी इथे आले आहे.
खासदार राणा म्हणल्या, तुम्ही राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचं एक वक्तव्य ऐकलं आहे का? लालू प्रसाद यादव म्हणालेत की आम्ही सत्तेवर आल्यानंतर येत्या काळात मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ‘संविधानासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचं आरक्षण टिकवून ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. मी संविधान डोक्यावर घेऊन संसदेत जातो’. एका बाजूला लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसच्या लोकांनी संविधान संपवण्याचा, आरक्षण संपवण्याचा विडा उचलला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील लोकांचा सन्मान करत आहेत.
हे ही वाचा >> “संविधान बदलाच्या चर्चेचा निवडणूक प्रचारात महायुतीला फटका”, मंत्री उदय सामंत स्पष्टच म्हणाले…
राणांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, ‘काँग्रेसला मत म्हणजेच पाकिस्तानला मत’ या नवनीत राणांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड पुटलं आहे. अशातच निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून तेलंगणामध्ये राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शादनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.