देशामध्ये पुढील काही दिवसांमध्ये ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांमधील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करताना दिसून येत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये देखील सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. मध्य प्रदेशमध्ये १७ नोहेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच दरम्यान नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना माजी महिला काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांनी मध्य प्रदेशमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने राज्यतील दोन कोटींपेक्षा अधिक युवांना त्रास सहन करावा लागत असल्याचे म्हणत सत्ताधारी भाजपा सरकारवर टीका केली आहे.

मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह चौहान यांच्या १८ वर्षांच्या सत्तेमध्ये बेरोजगारी, अनेक प्रकारच्या घोटाळ्यांमुळे राज्यातील युवा पिढीचे वाटोळे झाल्याचा आरोप शोभा ओझा यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शोभा ओझा म्हणाल्या, ”देशाची प्रगती ही युवा पिढीवर अवलंबून असते तसेच युवा पिढीच देशाचे वर्तमान आणि भविष्य ठरवते असे म्हटले जाते. मात्र मध्य प्रदेशमधील शिवराज सिंह यांच्या १८ वर्षांच्या सत्ता काळात युवा पिढी पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.”

हेही वाचा : मध्य प्रदेश : काँग्रेसच्या पहिल्या यादीत १९ महिला, शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात अभिनेते विक्रम मस्ताल यांना तिकीट!!

”मध्य प्रदेशमधील जनतेने गेल्या १८ वर्षांमध्ये बेरोजगारी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि अनेक घोटाळे पाहिले आहेत. दारू माफिया, भू – माफिया किंवा वाळू माफियांना सरकारचे संरक्षण मिळत आहे’,’ असा आरोप त्यांनी यावेळी केला. ”इतक्या वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांमुळे सरकारी नोकऱ्या देखील कोणाला मिळाल्या नाहीत. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये सुमारे ४० लाख तरुणांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी केली होती. आता यामध्ये सरकार केवळ २१ लोकांना नोकरी देऊ शकले ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे”, असे शोभा ओझा म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ”जर का खाजगी नोकऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास मध्ये प्रदेश हे असे एक राज्य आहे की गेल्या १८ वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक झाली नसावी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना शोभा ओझा म्हणाल्या, प्रियांका गांधी यांनी काँग्रेसच्या ‘शिका शिकवा’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिना ५०० रूपये, तसेच इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर महिना १००० रुपये आणि ११ व १२ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना १,५०० रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ”आम्ही आमच्या राज्यातील तरुणांना चांगले शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ जेणेकरून त्यांना या कारणांसाठी दुसरीकडे जावे लागणार नाही.”