केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. “महायुतीचे इंजिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे, डब्बे नाहीत”, असा निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर साधला.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे घटक पक्ष आहेत. महायुतीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई आणि आता मनसेही आली आहे. आमच्या महायुतीचे इंजिन हे नरेंद्र मोदी आहेत. आमचे सर्व डब्बे इंजिनला जोडलेले आहेत. ही विकासाची ट्रेन आहे. त्या ट्रेनमध्ये प्रत्येकाला बसण्यासाठी जागा आहे. या ट्रेनमध्ये गोरगरिब, शेतकरी, मजूर, ओबीसी, अल्पसंख्याक अशा प्रत्येकाला ट्रेनमध्ये बसून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जात आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : “तुमच्या रक्तात राष्ट्रावादी, हृदयामध्ये भाजपा आहे, आता किडनीमध्ये…”; ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला

फडणवीस पुढे म्हणाले, “राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे. पण डब्बे नाहीत. इंजिनमध्ये कोणाला बसण्याची संधी असते का? इंजिनमध्ये केवळ चालक बसतो. त्यांच्याकडे इंजिनही एक नाही. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे. त्यामुळे त्यांचे सर्व इंजिन विरुद्ध दिशेने चालले आहेत. हे इंजिन कोणी बारामतीकडे ओढते तर कोणी मुंबईकडे ओढते, अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांचे इंजिन जाग्यावरचे हालत नाही. अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी चालले आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या गाडीत बसून आपल्याला पुढे जायचे आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे. राहुल गांधी काल आले होते. ते काय म्हणतात हे कोणालाही समजत नाही. कधी ते म्हणतात एकीकडून आलू टाकला की तिकडून सोने निघते. कधी म्हणतात पांडवांनी जीएसटी लावला होता का? आता अशा प्रश्नांची काय उत्तरे द्यायचे? मी राहुल गांधी यांना आव्हान देतो, तुम्ही ६० वर्ष राज्य केले, तुमच्या ६० वर्षांमध्ये ओबीसींसाठी काय केले ते सांगा. १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओबीसींसाठी काय केले ते आम्ही सांगतो. होऊन जाऊद्या शर्यत”, असे थेट आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला दिले.