शिवसेना शिंदे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण नऊ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र या पहिल्या यादीत कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिंदे गटाकडे आहे. श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र नाशिकच्या जागेचाही पहिल्या यादीत उल्लेख नसल्यामुळे हा मतदारसंघ भाजपा किंवा राष्ट्रवादीच्या पारड्यात गेला आहे का? अशी शंका घेतली जात आहे.

रामटेकमधून कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले

शिवसेनेच्या फुटीनंतर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात आले असले तरी जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक मात्र ठाकरे गटासोबतच असल्याने तुमाने यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. रामटेक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथून विद्यमान खासदार कृपाल तुमाने दोनदा विजयी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यावेळी प्रारंभी तळ्यात-मळ्यात भूमिका घेणारे कृपाल तुमाने नंतर शिंदे गटासोबत गेले. काही दिवसांपूर्वीच उमरेडचे आमदार राजू पारवे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर आज शिंदे गटाने अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघासाठी राजू पारवेंना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, राजन विचारे, चंद्रहार पाटील यांना संधी

कोण आहेत शिंदे गटाचे उमेदवार?

राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य

संजय मंडलीक – कोल्हापूर</p>

सदाशिव लोखंडे – शिर्डी (अनुसूचित जाती)

प्रतापराव जाधव – बुलढाणा</p>

हेमंत पाटील – हिंगोली

श्रीरंग बारणे – मावळ

राजू पारवे – रामटेक (अनुसूचित जाती)

धैर्यशिल माने – हातकणंगले

संजय गायकवाड यांचं काय होणार?

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आजच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र सायंकाळी येथून प्रतापराव जाधव यांचे नाव जाहीर झाल्यामुळे संजय गायकवाड काय भूमिका घेणार? मुख्यमंत्री त्यांची मनधरणी करणार का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.