: Lok Sabha Election 2024 Shivsena UBT Candidate List: लोकसभा निवडणुकीची पहिली यादी शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केली आहे. सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून राजन विचारेंना संधी देण्यात आली आहे. आज यादी जाहीर होईल असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी एक्स वर यादी पोस्ट करत लोकसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून १७ नावं जाहीर १) नरेंद्र खेडकर-बुलढाणा२) संजय देशमुख-यवतमाळ-वाशिम३) संजोग वाघेरे पाटील-मावळ४) चंद्रहार पाटील-सांगली५) नागेश आष्टिकर-हिंगोली६) चंद्रकांत खैरे-छत्रपती संभाजी नगर७) ओमराजे निंबाळकर-धाराशिव८) भाऊसाहेब वाघचौरे-शिर्डी९) राजाभाऊ वाजे-नाशिक१०) अनंत गीते-रायगड११) विनायक राऊत-सिंधुदुर्ग, रत्नागिरी१२) राजन विचारे-ठाणे१३) अनिल देसाई- मुंबई दक्षिण मध्य१४) संजय दिना पाटील-मुंबई ईशान्य१५) अरविंद सावंत-मुंबई दक्षिण१६) अमोल किर्तीकर-मुंबई वायव्य१७) संजय जाधव-परभणी अशी १७ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. संजय राऊत यांनी आज सकाळी यादी जाहीर होईल हे स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आजच सकाळी यादी जाहीर करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी यादी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आणखी चार ते पाच नावं जाहीर होणार? अद्याप चार ते पाच जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळत आहे. अशातच ठाकरेंकडून कल्याणच्या जागेसाठीही अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या यादीत केदार दिघेंचं नाव असणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.