दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. पणजी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने उत्पल पर्रीकर आम आदमी पक्षात जाऊ शकता, अशी चर्चा सुरू होती. मात्र, शुक्रवारी उत्पल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी ३४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामध्ये उत्पल यांचे नाव नव्हते.

यादी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले होते, पण पणजी मतदारसंघातील विद्यमान आमदाराला तिकीट नाकारता येणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. गोव्यातील भाजपाचे दिग्गज नेते मनोहर पर्रीकर यांचे २०१९ मध्ये निधन झाले. सुमारे २५ वर्षांपासून पर्रीकर यांच्या ताब्यात असलेल्या पणजी मतदारसंघातून भाजपाने अतानासिओ मोन्सेरेट ‘बाबुश’ यांना उमेदवारी दिली आहे.

“गेल्यावेळीही लोकांचे समर्थन असतानाही पक्षाने काही विशिष्ट कारणांमुळे मला तिकिट नाकारले होते. तेव्हापण मी पक्षाचे ऐकले होते. आताचे निर्णय हे पर्रीकरांच्या पक्षातले वाटत नाहीत. त्यामुळे लोकांकरता मला हा निर्णय घ्यावा लागत आहे,” अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी दिली.

पणजीमधून उत्पल यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भाजपाचे गोवा राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, “आमच्या पक्षासाठी पर्रीकर कुटुंब हे नेहमीच आमचे कुटुंब आहे. पण उत्पल यांना त्या जागेवरून निवडणूक लढवायची होती. लढण्यासाठी, आमच्याकडे आधीच विद्यमान आमदार आहे आणि विद्यमान आमदाराला वगळणे योग्य होणार नाही. मात्र, आम्ही त्यांना इतर दोन जागांवर लढण्याचा पर्याय दिला होता आणि त्या दिशेने चर्चा सुरू आहे,” असे म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पल यांना आपचे तिकीट देऊ केले होते. ट्विटरवरून केजरीवाल यांनी भाजपावर टीका करत, “त्यांनी पर्रीकर कुटुंबासोबतही वापरा आणि फेकण्याचे धोरण स्वीकारले आहे, म्हणून आपने उत्पल यांना ‘आप’च्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची संधी आहे,” असे म्हटले होते.