Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर, भाजपा आणि जनता दलला ( धर्मनिरपेक्षक ) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे १२६ उमेदवार निवडून आले आहेत. तर, भाजपाचे ६० आणि जनता दलाचे १९ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत सर्वाचं लक्ष लागलेलं ते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या हुबळी-धारवाड मतदारसंघाकडे. पण, जगदीश शेट्टर यांना मोठा धक्का बसला आहे.
लिंगायत समाजाचे प्रमुख नेते समजले जाणारे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपाने तिकीट नाकारलं होतं. त्यानंतर जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजपाने जगदीश शेट्टर यांच्या विरोधात हुबळी मतदारसंघातून महेश तेंगिनाकायी यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, समोर आलेल्या आकडेवारीनुसार, जगदीश शेट्टर यांना दारूण पराभव झाला आहे.
हेही वाचा : भाजपाने गमावले दक्षिणेकडील एकमेव राज्य, पराभवाची ‘ही’ सहा मुख्य कारणं; जाणून घ्या…
भाजपाचे उमेदवार महेश तेंगिनाकायी यांनी जगदीश शेट्टर यांचा ३४ हजार २८९ मतांनी पराभव केला आहे. जगदीश शेट्टर यांना ६० हजार ७७५ मते पडली आहेत. तर महेश तेंगिनाकायी यांना ९५ हजार ६४ मते पडली आहेत.
बी.एस. येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय
६७ वर्षीय शेट्टर हे भाजपाचे निष्ठावं कार्यकर्ते होते. गेली तीन दशके ती भाजपाशी संबंधित होते. लिंगायत समाजातील प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचे ते निकटवर्तीय मानले जाणारे शेट्टर हुबळी-धारवाड मध्य या मतदारसंघातून सहा वेळा विजयी झालेले.
हेही वाचा : कर्नाटकात भाजपाचा दारूण पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “काँग्रेसचं…”
अमित शाहांची भविष्यवाणी खरी ठरली
अलीकडंच गृहमंत्री अमित शाह यांनी जगदीश शेट्टर यांच्या पराभवाचं भाकीत केलं होतं. “जगदीश शेट्टर पराभूत होणार आहेत,” असं अमित शाह म्हणाले होते. आज ( १३ मे ) समोर आलेल्या निकालात जगदीश शेट्टर यांचा पराभव झाला. त्यामुळे अमित शाहांची भविष्यवाणी खरी ठरल्याचं बोललं जात आहे.