संदीप नलावडे, लोकसत्ता

देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा हे राज्य आणि अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, पाँडेचेरी, दादरा नगर हवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशांतील मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्व केंद्रशासित प्रदेशांतील प्रत्येकी एक आणि गोव्यातील दोन असे एकूण सात मतदारसंघ येथे आहेत.

प्रथम गोव्याविषयी. महाराष्ट्राचे शेजारील राज्य असलेल्या गोव्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असे दोन मतदारसंघ असून दोन्ही ठिकाणी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच ७ मे रोजी मतदान होणार आहे. उत्तर गोवा या मतदारसंघात २०१४ व २०१९ मध्ये भाजपचे श्रीपाद नाईक निवडून आले. गेली १० वर्षे मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुष, पर्यटन आदी खात्यांच्या मंत्रीपदांची जबाबदारी नाईक यांनी सांभाळली आहे.  त्यांनी २५ वर्षांत काय केले? असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांना उमेदवारी दिली आहे. एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) प्रभावी नेते म्हणून ओळख मिळवलेले खलप आता काँग्रेसकडून उभे आहेत.  काँग्रेस व भाजप या बडया पक्षांना टक्कर देण्यास यावेळी मगोप नाही पण रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) हा पक्ष सज्ज झाला आहे. तीन वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या या पक्षाचा मनोज परब हा युवा नेता गोवेकरांवर प्रभाव पाडत आहे. या पक्षाने गोव्यातील परप्रांतीयांविरोधात हाक दिली आहे.

हेही वाचा >>> आघाडी धर्माचे पालन करा! पक्षनेतृत्वाचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

गोव्यातील प्रभावशाली व्यापारी कुटुंबातील एक असलेल्या पल्लवी धेंपे यांना भाजपने दक्षिण गोव्यातून उमेदवारी दिली आहे.२०१९ च्या निवडणुकीत ही जागा काँग्रेसने खेचून आणली होती. खासदार फ्रान्सिस्को सरदिन्हा यांना पुन्हा उमेदवारी न देता काँग्रेसने यंदा कॅप्टन विरियातो फर्नाडिस यांना उमेदवारी दिली आहे. माजी नौदल अधिकारी असलेल्या फर्नाडिस यांनी सरकारविरोधात आवाज उठविला आहे.

लक्षद्वीप मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. एम. सईद या मतदारसंघातून सलग १० वेळा निवडून आले. त्यांचे पुत्र मोहम्मद सईद यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीची (शरद पवार गट) आघाडी असली तरी लक्षद्वीपमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहेत. सध्याचे खासदार मोहम्मद फैझल यांना शरद पवार गटाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. ‘रालोआ’मध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे.

अंदमानात थेट लढत

अंदमान व निकोबार बेटांवर काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या कुलदीप राय शर्मा यांनी भाजपच्या विशाल जॉली यांच्यावर निसटता विजय मिळवला होता.  यंदा भाजपने रे यांनाच उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून पुन्हा शर्मा रिंगणात आहेत.

डेलकर यांना फायदा?

गुजरात व महाराष्ट्रच्या सीमेवर असलेल्या दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होत आहे. २०१९ मध्ये या मतदारसंघातून भाजपचे मोहनभाई डेलकर निवडून आले होते.  मात्र  २०२१ मध्ये मुंबईतील हॉटेलमध्ये डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजपच्या नेत्यांच्या छळामुळे डेलकर यांना आत्महत्या करण्याची वेळ आली, असा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला होता. डेलकरांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी कलाबेन या शिवसेनेतर्फे (उद्धव ठाकरे गट) निवडून आल्या. आता कलाबेन यांना भाजपने तिकीट दिले असून काँग्रेसने अजित महाला यांना उमेदवारी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीव व दमणमध्ये चुरस

दादरा आणि नगर हवेलीमध्ये विलीन होण्यापूर्वी दमण आणि दीव २०२० पर्यंत वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. हा भारतातील सर्वात लहान प्रशासकीय उपविभाग असून दमण व दीव या दोन्ही ठिकाणांमध्ये भौगोलिक अंतर आहे. या मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात २००९ पासून सलग तीन वेळा भाजपचे लालूभाई पटेल हे निवडून आले. भाजपने त्यांना चौथ्यांदा संधी दिली असून काँग्रेसने केतन पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.