जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताच्या निवडणूक प्रक्रियेकडे पाहिले जाते. आज (दि. २६ एप्रिल) देशभरातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. एकूण १२०६ उमेदवार मतपेटीतून आपले नशीब आजमावत आहेत. खरंतर आज ८९ मतदारसंघात मतदान होणार होते. मात्र मध्य प्रदेशच्या बेतूल मतदारसंघातील बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्यामुळे याठिकाणची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात दक्षिणेतील केरळ राज्यातील सर्वच्या सर्व २० मतदारसंघात मतदान पार पडेल. तर कर्नाटकातील २८ पैकी १४, राजस्थानमधील १३, महाराष्ट्र
आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशमधील ७, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी ३ आणि मणिपूर, त्रिपुरा, जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एका मतदारसंघात मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडताना केरळ, राजस्थान आणि त्रिपुरा राज्यातील सर्व मतदारसंघ आटोपणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करण्याची मुभा असणार आहे. देशभरात एकूण सात टप्प्यात निवडणूक होत असून ४ जून रोजी निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ६३ टक्के मतदान झाले होते. आता दुसऱ्या टप्प्यात तरी हा आकडा वाढतो का? हे पाहावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात या आठ मतदारसंघात लढत

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात किती टक्के मतदान होते, हे उद्या दिसेल.