Maharashtra Assembly Election BJP 3rd Candidate List: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं तिसरी यादी जाहीर केली आहे. पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी २५ उमेदवारांची जाहीर केली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून १४६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोर्शी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपानंही या मतदारसंघातून उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे.
तीन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं!
भाजपांन आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये तीन विद्यमान आमदारांची तिकिटं कापल्याचं दिसून येत आहे. त्यात आर्णीतून संदीप दुर्वै यांच्याऐवजी राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मध्यमधून विकास कुंभारे यांच्याऐवजी प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आर्वीतून दादाराव केचे यांच्याऐवजी सुमीर वानखेडे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
वाचा आज जाहीर झालेल्या भाजपा उमेदवारांची संपूर्ण यादी
क्र. | मतदारसंघ क्रमांक | मतदारसंघ नाव | उमेदवार नाव |
१ | ३२ | मुर्तिजापूर (SC) | हरिश पिंपळे |
२ | ३५ | कारंजा | सई डहाके |
३ | ३९ | तेओसा | राजेश वानखडे |
४ | ४३ | मोर्शी | उमेश यावलकर |
५ | ४४ | आर्वी | सुमित वानखेडे |
६ | ४८ | कटोल | चरणसिंग ठाकूर |
७ | ४९ | सावनेर | आशीष देशमुख |
८ | ५५ | नागपूर मध्य | प्रवीण दटके |
९ | ५६ | नागपूर पश्चिम | सुधाकर कोहले |
१० | ५७ | नागपूर उत्तर (SC) | मिलिंद माने |
११ | ६२ | साकोली | अविनाश ब्राह्मणकर |
१२ | ७१ | चंद्रपूर (SC) | किशोर जोरगेवार |
१३ | ८० | आर्णी (ST) | राजू तोडसाम |
१४ | ८२ | उमरखेड (SC) | किसन वानखेडे |
१५ | ९० | देगलूर (SC) | जितेश अंतापूरकर |
१६ | १२८ | डहाणू (ST) | विनोद मेढा |
१७ | १३३ | वसई | स्नेहा दुबे |
१८ | १५२ | बोरीवली | संजय उपाध्याय |
१९ | १६४ | वर्सोवा | डॉ. भारती लव्हेकर |
२० | १७० | घाटकोपर पूर्व | पराग शाह |
२१ | २३१ | आष्टी | सुरेश धस |
२२ | २३५ | लातूर शहर | डॉ. अर्चना पाटील चाकूरकर |
२३ | २५४ | माळशिरस (SC) | राम सातपुते |
२४ | २५९ | कराड उत्तर | मनोज घोरपडे |
२५ | २८५ | पळुस-कडेगाव | संग्राम देशमुख |
भारतीय जनता पक्षानं तिसरी यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मोर्शी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरदेखील भारतीय जनता पक्षानं आपल्या उमेदवार यादीमध्ये मोर्शीतून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
प्रकाश मेहता, गोपाळ शेट्टींना उमेदवारी नाकारली
घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता उमेदवारीसाठी इच्छुक होते असं सांगितलं जात आहे. मात्र, त्यांना तिकीट नाकारून भाजपानं पुन्हा पराग शाह यांनाच उमेदवारी दिली आहे. तसेच, बोरीवलीमधून गोपाळ शेट्टी उमेदवारीसाठी इच्छुक असताना संजय उपाध्याय यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांना लातूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.