कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. २२४ जागांपैकी काँग्रेसने १३६ जागांसह एकहाती सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. काँग्रेसने कर्नाटक जिंकलं असलं तरी मुख्यमंत्री कोण होणार यावरून काँग्रेसमध्ये पेच निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण येत आहे. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना कर्नाटक मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसचा कोणता नेता बसणार असा प्रश्न विचारला असता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते शनिवारी (१३ मे) निकालानंतर माध्यमांशी बोलत होते.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “आजचा कर्नाटकातील विजय जनतेचा आहे. जनतेने आम्हाला विजयी करून एका भ्रष्ट सरकारचा पराभव केला आहे. आम्हाला पुढे खूप काम करायचं आहे. आम्ही जी आश्वासनं दिली ती आम्ही पूर्ण करू. आम्ही पाच गॅरंटी दिल्या आहेत. महिला, दलित, वंचित आणि इतर सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला. सामूहिक नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली आणि विजय मिळवला.”
“तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुमची साथ देतात”
“आम्हाला सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं. ते सगळीकडे फिरले आणि प्रत्येक ठिकाणी फिरले. त्यांच्या प्रभावाने अनेक ठिकाणी विजय मिळाले. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो. त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळेच काँग्रेसला इतका मोठा विजय मिळवता आला. तुम्ही चांगलं काम केलं तर लोक तुमची साथ देतात. आगामी काळातील निवडणुकांमध्येही आम्ही असाच विजय मिळवण्याचा प्रयत्न करू,” असं मत मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार?”
कर्नाटकमधील विजयानंतर काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचा निवड होणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबत मल्लिकार्जुन खरगेंना प्रश्न विचारला असता ते स्पष्टपणे म्हणाले, “आमच्या पक्षात एक प्रक्रिया आहे. कधीही कोणत्याही राज्यात निवडणूक झाल्यावर आम्ही त्या प्रक्रियेनुसारच निर्णय घेतो. त्यानुसार आमदारांची बैठक बोलावली जाते.”
“केंद्रीय निरीक्षक बैठकीला जातात. बैठकीतून जे मत तयार होईल ते पक्षश्रेष्ठींना सांगितलं जातं. त्यात मी, राहुल गांधी असे सगळे नेते असतात. सर्व लोक मिळून त्यावर निर्णय घेतो. मात्र, ही नंतरची गोष्ट आहे. हा लगेच घेतला जाणारा निर्णय नाही,” असंही मल्लिकार्जुन खरगेंनी नमूद केलं.