भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकल्या तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकशाही संपवतील असा दावा विरोधक करत आहेत. विरोधकांचे सातत्याने होणारे हे दावे पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली. राज ठाकरेंची ही मागणी मोदींनी लगेच पूर्ण केली. महायुतीच्या मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत आज (१७ मे) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (दादर) संयुक्त सभा घेतली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींकडे सहा मागण्या मांडल्या.

राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी एक मागणी आहे. ते गेल्या काही सभांमधून ते सातत्याने सांगतायत, मात्र आज जरा त्यांनी खडसावून सांगायला हवं. त्यांनी विरोधकांना सांगावं की या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं आहे, त्याला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही (नरेंद्र मोदी) कधी आपल्या संविधानाला धक्का लावणार नव्हता, मात्र तुमचे विरोधक जो प्रचार करत आहेत. ते पाहता त्यांना उतर देऊन तुम्ही त्यांची तोंडं कायमची बंद करायला हवीत. त्यांची तोंडं परत कधी उघडली जाऊ नयेत यासाठी तुम्ही त्यांना खडसावून सांगा की आपल्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही.”

राज यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी ते म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबरोबर जाऊन बसलेल्या नकली शिवसेनावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा अपमान केला आहे. इंडिया आघाडीवाले केवळ शिवाजी महाराज आणि सावरकरांचा अपमान करून स्वस्थ बसलेले नाहीत. तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा देखील अपमान करत आहेत. देशात धर्माच्या आधारे आरक्षण देण्यास बाबासाहेबांचा विरोध होता. त्यावर संविधान सभेचंही एकमत झालं होतं. संविधान सभेने ठणकावून सांगितलं होतं की देशात धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. मात्र आता हे इंडिया आघाडीवाले लोक दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचं आरक्षण हिरावून ते आरक्षण व्होट जिहाद करणाऱ्या लोकांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तेसाठी चाललेली त्यांची ही दगाबाजी आम्ही खपवून घेणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेस संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसतेय”

नरेंद्र मोदी म्हणाले, “हे लोक (विरोधक) माझ्यावर आरोप करतायत की मी संविधान बदलेन. मात्र जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवून संपूर्ण देशात एक संविधान लागू करणारा हा मोदी संविधानाचा सर्वात मोठा रक्षक आहे. जे लोक आज संविधान डोक्यावर घेऊन नाचत आहेत त्यांनीच संविधानाचा अपमान केला आहे. या लोकांनी संविधानाची मूळ प्रत बदलली. त्यात त्यांनी त्यांच्या हिशेबाने बदल केले. संविधानाच्या पहिल्या प्रतिमध्ये एका बाजूला लिखित दस्तावेज होते तर दुसऱ्या बाजूला असंख्य चित्रे होती. ही चित्रे आपला हजारो वर्षांचा वारसा होती. परंतु, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वात आधी ही सगळी चित्रे संविधानातून काढून टाकली. त्यानंतर संविधानाची मूळ प्रत कपाटात ठेवून दुसरी प्रत आणली, ज्यामध्ये केवळ लिखित माहिती आहे. त्यांनी एक प्रकारे संविधानाचा आत्मा मारून टाकला आणि आता हे लोक संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. मी काँग्रेसला ठणकावून सांगतोय की त्यांना मी दलितांचं, मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं आरक्षण हिसकावू देणार नाही आणि हीच नरेंद्र मोदीची गॅरंटी आहे.”