लोकसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. मात्र, त्याआधी देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत भारतीय जनता पार्टीवर एक्झिट पोलच्या आकड्यावरून हल्लाबोल केला आहे. तसेच ‘नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा’, असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

भारतीय जनता पार्टीने या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, सध्या समोर आलेल्या कलानुसार भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीए २९० जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. मात्र, यामध्ये अजून काही बदल होऊ शकतात. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी इंडिया आघाडीतील नेत्यांनी संपर्क साधल्याची चर्चा आहे. दुसरीकडे टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांच्याशीही संपर्क साधल्याची चर्चा आहे. दरम्यान, निकाल जसा स्पष्ट होईल तशा आणखी घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “मोदी पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन” आप नेते सोमनाथ भारतींना वक्तव्य पडले महागात, भाजपा नेत्यांनी भर बाजारात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसंच एनडीएच्या जागांच्या घसरणीवर भाष्य करत नरेंद्र मोदी हे आता माजी पंतप्रधान होणार हे आता सिद्ध झाले आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, हाच या निवडणुकीचा संदेश आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.