लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात प्रचाराच्या तोफा रोजच धडाडत आहेत. राजकीय पुढारी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. नुकतेच निवडणूक आयोगाने भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नोटीस पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील उल्लेखांबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हल्ली खूप नैराश्यग्रस्त दिसत आहेत. कदाचित काही दिवसांनी स्टेजवरच ते रडतानाही दिसू शकतील.

कर्नाटकच्या विजापूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. “आजकाल भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तणावात असल्याचे दिसून हेत आहे. कदाचित काही दिवसांनी ते स्टेजवरच रडूही शकतात”, असे राहूल गांधी म्हणाले.

याशिवाय राहुल गांधी पुढे म्हणाले, निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे जसे की, गरीबी, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लोकांच्या जीवनाशी निगडित या पश्नांवर पंतप्रधान भाष्य करताना दिसत नाहीत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुळ मुद्द्यावरून लक्ष भकवटून ते चीन किंवा पाकिस्तानवर बोलतात. कधी कधी ते लोकांना थाळ्या बडवायला सांगतात तर कधी कधी ते सभेला उपस्थित लोकांना मोबाइलचा टॉर्च सुरू करून हात उंचवायला सांगतात”, असे राहुल गांधी म्हणाले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा “अब की बार ४०० पार” चा नारा हरवला असल्याचे काही काँग्रेस नेते म्हणाले होते. त्याच विधानाचा आधार घेत राहुल गांधी यांनी ही टीका केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेस पक्ष जर सत्तेत आला तर ते देशाची राष्ट्रीय संपत्ती घुसखोर आणि अधिक मुलं असणाऱ्या लोकांमध्ये वाटू इच्छितात, असा आरोप त्यांनी केला. अधिक मुलांचा संदर्भ मुस्लीम समुदायाकडे बोट दाखविणारा असल्याचे म्हटले जाते. तसेच अनुसूचित जाती (SC) आणि जमाती (ST) यांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लीम समाजाला देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, असाही आरोप भाजपाने केला.