नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना रविवारी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलं. रविवारी ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. इंडिया आघाडीही थोड्याफार फरकाने मागे होती. त्यामुळे इंडिया आघाडीकडूनही सत्ता स्थापनेचा दावा केला जात होता. तत्पूर्वी एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती केली असून ९ जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं.

आज सकाळी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. एनडीएच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि नरेंद्र मोदी यांची भाजपच्या संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यात आले. एनडीएच्या घटक पक्षांची पाठिंब्याची पत्रेही राष्ट्रपतींना देण्यात आली.

एनडीएचे पत्र मिळाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना बोलावून त्यांना पंतप्रधान पदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले. तसंच, केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले असून शपथविधी सोहळ्याबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंतप्रधान पदासाठी तिसऱ्यांदा नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “एनडीएची बैठक झाली होती. एनडीएच्या सर्व मित्रांनी मला पुन्हा एकदा या दायित्वासाठी पसंती दिली आहे. एनडीएच्या घटकपक्षांनी याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली. त्यानुसार, राष्ट्रपतींनी मला आता बोलावलं होतं. मला पंतप्रधान पदाच्या रुपाने नियुक्ती दिली आहे. मला शपथविधीसाठी आणि मंत्रिपदाच्या यादीसाठी त्यांनी सूचित केलं आहे.”

हेही वाचा >> कोण आहेत लोकसभेचे ७ अपक्ष खासदार? त्यांची साथ एनडीएला की इंडिया आघाडीला?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुवर्ण महोत्सवासाठी १८ वी लोकसभा महत्त्वाची ठरेल

“स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. आता २५ वर्षे आहेत जी अमृत वर्षाची २५ वर्षे आहेत. २०४७ साली देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असेल. या सुवर्ण महोत्सवात आपल्या देशाची स्वप्न पूर्ण झालेली असतील. त्यासाठी ही १८ वी लोकसभा महत्त्वाची ठरणार आहे. एनडीए सरकारला तीनवेळा देशाची सेवा करण्याचा आदेश देशवासियांनी दिला आहे. मी देशातील नागरिकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. मी देशातील नागरिकांना विश्वास देतो की, गेल्या दोन टर्ममध्ये ज्या गतीने देश पुढे गेला आहे, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन स्वच्छपणे दिसून येतोय. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे, ही प्रत्येक भारतीयांसाठी गर्वाची बाब आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.