गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार पंजाबमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आयोगाने घोषणा केल्यापासूनच नियमानुसार आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मंगळवारी उत्तर प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनीच भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला असताना दुसरीकडे पंजाबमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांच्या भावानेच भाजपामध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

पंजाबमध्ये महिन्याभरावर मतदानाची तारीख आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी सीमेलगत असणाऱ्या या संवेदनशील राज्यात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांत पंजाबच्या राजकीय वर्तुळात मोठमोठे हादरे देणारे भूकंप झाल्याचं आख्ख्या देशानं पाहिलं आहे. नवज्योतसिंग सिद्धूंशी असलेले मतभेत विकोपाला गेल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर चन्नी मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्याशीही मतभेद झाल्यानंतर सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा सादर केला. शेवटी पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करून सिद्धूंची मनधरणी करावी लागली. त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला.

चंदीगडमध्ये झाला पक्षप्रवेश

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या गोंधळावरून अद्याप राजकारण सुरू असून हे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. त्यावरून वाद सुरू असतानाच आता पंजाबमध्ये अदून एक राजकीय भूकंप झाला आहे. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचे चुलत बंधू जसविंदर सिंग धालिवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या उपस्थितीत चंदीगढमध्ये जसविंदर सिंग यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण ११७ सदस्यांच्या विधानसभेमध्ये सध्या काँग्रेसकडे बहुमत आहे. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा आणि नव्या पक्षाची स्थापना, तसेच भाजपाशी असलेली जवळीक यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.