तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार चालू आहे. काँग्रेसनेही यंदाच्या निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी स्वतः उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभा घेत आहेत. यादरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करत आहेत. एका सभेत केसीआर यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेसने काय केलं? असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, मला केसीआर यांना सांगायचं आहे की, तुम्ही ज्या रस्त्यांवरून चालताय, ते रस्ते काँग्रेसने बनवले आहेत आहेत. तुम्ही ज्या शाळेत आणि विद्यापीठात शिकलात, ते विद्यापीठ आणि इतर अनेक विद्यापीठं काँग्रेसने उभारली आहेत. ज्या हैदराबादमधून तुम्ही रोज कोट्यवधी रुपयांची चोरी करतायत ते हैदराबाद शहर काँग्रेसने या तेलंगणातील जनतेबरोबर बनवलं आहे.

काँग्रेस खासदार म्हणाले, एक विचित्र गोष्ट आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात, तेच तुम्ही (केसीआर) प्रत्येक वेळी बोलत असता. नरेंद्र मोदीदेखील म्हणाले होते काँग्रेसने काय केलं? आता तुम्हीदेखील तेच म्हणताय. खरंतर भाजपा आणि बीआरएस हे एकच आहेत. भाजपाविरोधात असणाऱ्या नेत्यांवर, पक्षांवर सतत कारवाई होते. ईडी, सीबीआयवाले मागे लागतात, पण बीआरएसच्या मागे लागत नाहीत.

हे ही वाचा >> तेलंगणात काँग्रेस की चंद्रशेखर राव सत्ता राखणार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, माझ्या अंगावर २४ खटले आहेत. माझ्यासाठी ही २४ पदकं आहेत. तेलंगणातल्या निवडणुकांमध्ये मोदी आणि भाजपा केसीआर यांची मदत करतात. तर लोकसभा निवडणुकीत केसीआर भाजपाची मदत करतात. हे एकत्र आहेत. भाजपाने कधी केसीआर यांचं घर हिसकावलं नाही. माझं घर कोट्यवधी भारतीयांच्या काळजात आहे. केसीआर मात्र भाजपाच्या कृपेने महालात राहतात. भाजपाने कधी केसीआर यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द केलं नाही.