राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. त्यातच आज ( १९ नोव्हेंबर ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानमधील चुरू येथे सभा पार पडली. यावेळी क्रिकेटचा संदर्भ घेत पंतप्रधानांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. काँग्रेसवाले एकमेकांना धावबाद करत आहेत. जे पक्षात शिल्लक राहिलेत त्यांच्याही विकेट पडत आहेत. भाजपा राजस्थानचे चषक जिंकत आहे, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

“राजस्थानमध्ये भाजपाचं सरकार स्थापन झाल्यावर ३ डिसेंबरपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात १२ हजार रूपये मिळणार,” असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं आहे.

हेही वाचा : राजस्थानमध्ये काँग्रेसचा अखेर ‘साथ साथ है’चा नारा

“बाकीचे लाच घेऊन सामना फिक्सिंग करत आहेत”

पंतप्रधान मोदी म्हणाले, “या भूमीच्या प्रत्येक कणात भक्ती आणि शक्ती आहे. काँग्रेसचे लोक एकमेकांना धावबाद करत आहे. पक्षात उरलेल्यांचीही महिला आणि अन्य प्रश्नांवर चुकीची विधाने केल्याने विकेट पडत आहे. बाकीचे लाच घेऊन सामना फिक्सिंग करत आहेत.”

“मुख्यमंत्र्यांची जादू लाल डायरीत दिसत आहे”

“संघाची परिस्थिती अशी असेल, तर ते धावा कशा काढणार? आणि तुमच्यासाठी काय काम करणार? लाल डायरीची पाने हळू-हळू उघडत आहेत, तसं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या फ्यूज उडत आहेत. मुख्यमंत्र्यांची जादू लाल डायरीत दिसत आहे. आपल्याला प्रत्येक बूथवर पाच ते सहा शतके लगवायची आहेत. काँग्रेसने प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. भाजपाचं सरकार आल्यानंतर सर्व भ्रष्टाचारी लोकांची विकेट घ्यायची आहे,” असं पंतप्रधानांनी म्हटलं.

हेही वाचा : राजस्थानमध्ये जाट मतदारांसाठी काँग्रेसची खास रणनीती, आरएलडी पक्षाशी हातमिळवणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“काँग्रेसच्या राज्यात देवाचं नाव घेणंही अवघड झालं आहे”

“राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरूणांच्या भविष्याचा हा विजय असेल. या मातीतील तरूण देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहेत. या विरांचा छळ करण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. काँग्रेसच्या राज्यात देवाचं नाव घेणंही अवघड झालं आहे,” असा आरोप मोदींनी केला आहे.