Sanjay Raut MVA Seat Sharing Maharashtra assembly election 2024 : “आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करेल”, असा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीची जागावाटपावर चर्चा चालू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना प्रश्न विचारला, मविआमधील काही नेते दावा करत आहेत की मुंबईत महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला २० ते २२ जागा मिळणार आहेत. हे वृत्त खरं आहे का? यावर संजय राऊत म्हणाले, कोण काय सांगतंय? आमचे सहकारी काय सांगतात? याविषयी मी आत्ता काहीच बोलणार नाही. मात्र मुंबईतील ९९ टक्के जागांबाबतचा निर्णय झाला आहे.

संजय राऊत म्हणाले, काल आमची महाविकास आघाडीची मुंबईत एक बैठक पार पडली. मुंबईतील जागावाटपासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख पक्षांचे नेते या बैठकीला हजर होते. अगदी सुरळीत चर्चा पार पडली. या बैठकीत मुंबईतील ९९ टक्के जागांवर आमची सहमती झाली आहे. मुंबई हा मोठा प्रदेश आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. त्यामुळे आम्ही मुंबईबाबतच्या चर्चेला बराच वेळ दिला.

मुंबई आमच्या ताब्यात असायला हवी : राऊत

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, मुंबईवर नेहमीच शिवसेनेचं व मराठी माणसाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे मुंबईत आम्ही अत्यंत काळजीपूर्वक जागावाटप केलं आहे. कारण काही लोक मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा व लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मुंबई आमच्या ताब्यात असायला हवी. त्याच पद्धतीने आम्ही जागावाटप करत आहोत. मविआ म्हणून आमची आघाडी आहे. तसेच आमचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. त्यामुळे कोणाच्याही पोटात दुखण्याचं कारण नाही. कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याने त्यावर औषध घ्यावं.

हे ही वाचा >> Ambadas Danve : मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध; छ. संभाजीनगर विमानतळाबाहेर मविआचं आंदोलन, अंबादास दानवे पोलिसांच्या ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा

विदर्भावर काँग्रेसची पकड आहे, त्यामुळे काँग्रेसला विदर्भात ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटापेक्षा अधिक जागा दिल्या जातील अशी चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात समतोल राखून आम्ही जागावाटप करत आहोत. अर्थात ही चर्चा बंद दाराआड सुरू आहे. पुढेही बंद दाराआड चर्चा होईल. त्यासंदर्भात बाहेर येऊन कोणीही काहीही सांगणार नाही. मी स्वतः देखील काही सांगणार नाही. मला आत्ता एवढंच सांगायचं आहे की मुंबईचा विषय संपला आहे. २७ ऑगस्टपासून आम्ही उर्वरित महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा करणार आहोत.