सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मविआने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना केली होती. त्यांच्या मागणीवर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्या आहेत. त्यामुळे तिथे ठाकरे गटाचा उमेदवार आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

“विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजू शकतो. ते काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. मात्र, काही वर्षांपासून सांगलीत जातीयवादी शक्ती वाढू लागल्या आहेत. विधानसभेला मिरजेत संघाचा माणून निवडून येतो आणि दंगे घडवले जातात. हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांना माहिती आहे. गेल्या १० वर्षांपासून सांगलीत भाजपाचे खासदार निवडून येत आहे. त्यांचा सामना करायचा असेल, तर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणे गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – “सांगलीबाबत काँग्रेसने…”, विश्वजीत कदम यांनी मविआच्या जागावाटपावर मांडली स्पष्ट भूमिका; म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी…”

“गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते काम करत आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज जर जातीयवादी शक्तींचा समाना करायचा असेल, तर तिथे शिवसेना हवी आहे. त्यामुळे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आणि आता काँग्रेस पक्षानेही आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे”, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींवरही केली टीका

दरम्यान, विरोधक हे संविधान धोक्यात असल्याचा खोटा प्रचार करतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यावरून संजय राऊत यांनी मोदींना लक्ष्य केलं. “पंतप्रधान मोदी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा खाली आणली आहे. पंतप्रधानपदी असेलल्या व्यक्तीने इतकं खोटं बोलू नये. मोदींना देशात पुतीन मॉडेल आण्याचं आहे. त्यांना देशात विरोधक नको आहे. त्यांना विधानसभा आणि लोकसभा विरोधीपक्षविना हवी आहे. खरं तर पंतप्रधान मोदी यांची विचारसरणीच देशातील संविधानासाठी धोकादायक आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – Ajit Pawar: “तुम्ही मला मूर्ख समजू नका, मी…”, अजित पवार ‘त्या’ प्रश्नावर भडकले; विजय शिवतारेंबाबत मांडली भूमिका!

“विरोधकांना तुरुंगात टाकायचं, त्यांच्यावर खोटे आरोप करायचे, त्यांना धमक्या देऊन आपल्या पक्षात घ्यायचं काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. हाच देशातील संविधानाला सर्वात मोठा धोका आहे”, असेही ते म्हणाले.