लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात आज एकीकडे शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामतीत आज शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवारांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार काय म्हणाले?

“निवडणुकीच्या शेवटची सभा आपण दुसरीकडे घेत असतो. मात्र, आज सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी ती जागा घेतली. त्यामुळे आपण या ठिकाणी सभा घेत आहोत. ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे. मध्यंतरी कन्हेरीच्या सभेत एका कोपऱ्यात एक अनओळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे आज बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे. एवढे महत्व तुमच्या लोकांच्या निर्णयावर असणार आहे”, असे शरद पवार म्हणाले.

हेही वाचा : “अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही”; शरद पवारांचा इशारा कुणाला?

आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे भाषण झाले. ते मीदेखील ऐकले. या तीनही भाषणामध्ये अनेक चांगले मुद्दे मांडले. तीनही उमेदवारांनी चांगली मुद्दे मांडली. आता जोपर्यंत आपण सर्वजण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकत नाही. त्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. प्रश्न खूप आहेत. महागाई, शेती, रोजगारासह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जनतेचा निर्णय हा बारामतीकरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल”, असे मत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

इंदापूरच्या सभेत शरद पवारांची भाजपावर टीका

“देशाची सत्ता भाजपाकडे आहे. भाजपाकडे सत्ता आल्यानंतर भाजपाने ज्या प्रकारे निर्णय घेतले, त्यामुळे मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे. आता आम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांनी एकत्र येत इंडिया आघाडी तयार केली. यानंतर देशातील परिस्थिती बदलायला लागली आहे. आज केरळ, तामिळनाडू, आध्र प्रदेशसह अनेक राज्यात भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसामध्ये भाजपाची सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. देशाचा कारभार योग्य पद्धतीने करायचा असेल तर भाजपाचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही”, अशी टीका शरद पवार यांनी भाजपावर केली.