शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष जुलै २०२३ पासून अत्यंत प्रखर झाल्याचं महाराष्ट्र पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या संघर्षाला आणखी धार आली आहे. शरद पवारांनी आता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस असं वक्तव्य केलं आहे. धनंजय मुंडे हे अजित पवारांबरोबर आहेत. महाराष्ट्राच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस असं शरद पवार म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

“तुम्ही (शरद पवार) पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.” असं धनंजय मुंडे म्हणाले. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या पुरंदर या ठिकाणी राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात धनंजय मुंडे शरद पवारांवर टीका केली होती.

अजित पवारांना एकटं पाडलं जातं आहे-धनंजय मुंडे

तसंच अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातं आहे असंही धनंजय मुंडेंनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. तसंच देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचेही चांगले राजकीय संबंध आहेत. मात्र धनंजय मुंडेंबाबत विचारलं असता मी त्यांच्यावर भाष्य करणार नाही कारण धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “आत्मा अस्वस्थ आहे, पण..” शरद पवारांनी दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर!

शरद पवार यांनी काय म्हटलं आहे?

“धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली. हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करु लागले आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढे बोलणार नाही.” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय मुंडे हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांनी भाजपातून त्यांची कारकीर्द सुरु केली. मात्र शरद पवार यांनी भाजपातून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलं. त्यांना आत्तापर्यंत विविध जबाबदाऱ्याही दिल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते सामाजिक न्याय मंत्रीही होते. आता शरद पवार यांनी मात्र धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. यावर धनंजय मुंडे काही भाष्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.