जुलै २०२३ या महिन्यात शरद पवारांना राजकारणात मोठा धक्का बसला. तो धक्का हा होता की अजित पवार यांनी पक्षातल्या ४२ आमदारांना बरोबर घेत थेट सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधला ४२ आमदारांचा गट सत्तेत सहभागी झाला. या भूमिकेला शरद पवारांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव हे अजित पवारांच्या गटाला देण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढत पार पडली आहे. अशात अजित पवार हे वारंवार म्हणत आहेत की आम्ही तुमच्या (शरद पवार) पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? आता यावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे.

अजित पवारांनी वारंवार काय म्हटलं आहे?

“आम्ही वरिष्ठांच्या पोटी (शरद पवार) जन्माला आलो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं. काही झालं नसतं, पक्ष माझ्या ताब्यात आला असता. खरं तर मी साहेबांच्या सख्ख्या भावाचाच मुलगा. त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही हे आमचं दुर्दैव. आम्हाला सांगितलं गेलं की मुलीला राष्ट्रीय अध्यक्ष करायचं आहे. आम्ही ते पण मान्य केलं.” असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. तसंच शरद पवार यांचं वय झालं आहे आता त्यांनी राजकारणात थांबायला पाहिजे असाही सल्ला अजित पवारांनी दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हा मुद्दा समोर आला. या सगळ्यावर शरद पवारांनी लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- काकांच्या आयुष्यात पुतण्या व्हिलन! महाराष्ट्राच्या राजकारणातल्या तीन घराण्यांचं कनेक्शन!

शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर

“सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात आणि अजित पवार यांना राज्याच्या राजकारणात जबाबदारी देण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी दिला होता, पण मी तो स्वीकारला नाही, या म्हणण्यात तथ्य नाही. सुप्रिया यांना फक्त खासदारकी दिली असून त्या लोकसभेतील पक्षाच्या गटनेत्या आहेत आणि आतापर्यंत दिल्लीच्या राजकारणातच आहेत. त्यांना कधीही सत्तापद देण्यात आलेले नाही. मात्र अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली. राज्यमंत्रीपदापासून अनेक कॅबिनेट मंत्रीपदे, महत्त्वाची खाती, तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद, विधिमंडळातील गटनेतेपद, विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे सर्व काही देण्यात आले. मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. सत्तेत असल्याशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत, या अजित पवार यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात भूमिका घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्या हे द्वंद्व पाहण्यास मिळतं आहे. अशात अजित पवारांनी आपल्या भाषणांमधून जो दावा वारंवार केला आहे तो दावा शरद पवारांनी खोडून काढत मी कधीही पुतण्या आणि मुलगी असा भेद केला नाही असं म्हटलं आहे. आता याबाबत अजित पवार काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.