लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी काही तास उरले आहेत. महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. सर्वाधिक रंगतदार होणार आहे ती बारामती या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या निवडणुकीला उभ्या राहणार आहेत यात काही शंकाच नाही. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. बारामतीतला सामना नणंद विरुद्ध भावजय इतकाच नाही तर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा असणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात सुनेत्रा पवारांची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे.

काय आहे सुनेत्रा पवार यांची फेसबुक पोस्ट?

“समाजाच्या शेवटच्या घटकाकडूनही गजर घडाळ्याचाच”

माळेगावमधून बाहेर पडल्यानंतर साईनगर येथे रस्त्याच्या कडेला बरेच लोक उभे होते. आधी काहीच कल्पना नव्हती. मात्र तरीही हे लोक बहुदा आपल्यालाच भेटण्यासाठी थांबले असतील अशी शक्यता वाटली आणि गाडी थांबवली.
भटके जोशी समाज संघटनेचे ते पदाधिकारी, कार्यकर्ते होते. या समाज बांधवांना मी माळेगावात आल्याचे समजल्याने ते मलाच भेटायला गावात येत होते. मात्र वाटेतच भेट झाली. ही सर्व मंडळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून आजपर्यंत कशी मदत झाली ते अगदी भरभरून आनंदी चेहऱ्याने सांगत होते. कोरोना काळात तर दादांनी फक्त त्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील त्यांच्या अनेक समाज बांधवांना भक्कम आधार दिल्याचे सांगितले. ते बोलत असताना मी गाडीतून उतरू लागले तर म्हटले, ‘नका त्रास घेऊ आत्ता. आम्हाला दादांनी आमच्यासाठी काय केलं तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आम्ही सर्वजण तुमच्याच सोबत आहे, रामनवमीच्या कार्यक्रमाला मात्र नक्की यायचं तुम्ही. निमंत्रण घेऊन येतोच’, असे आग्रहाने सांगितले. नक्की येईन, असं मनापासून त्यांना सांगितलं आणि निघाले.

हे पण वाचा- ‘ताई आणि वहिनींना मत देणं, ही लोकशाहीची थट्टा’, विजय शिवतारेंची पवार कुटुंबावर पुन्हा टीका

अजित पवारांवरचं जनतेचं प्रेम आणि हक्क दिसून आला

आज अवघ्या काही वेळात केवढ्या वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या घटकातील जनतेचे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा यांच्यावरील प्रेम, विश्वास आणि हक्क दिसून आला. दिवसाचे सोळा – अठरा तास हा माणूस अक्षरशः राबतोय, झिजतोय ते कशाप्रकारे रुजलंय याचं दर्शन शेती, उद्योग क्षेत्रात असणाऱ्या चव्हाण कुटुंबियांच्या वस्तीवर झालं, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या माहेरचे वंशज राजे जाधवराव यांच्या वाड्यात झालंच आणि परतताना वाटेत जोशी समाज बांधव भेटून रस्त्यावर देखील झालं.राष्ट्रवादीवरील हे प्रेम व्यक्त केल्याबद्दल भगवान गोंडे, शेखर गोंडे, संतोष सुपेकर, गौरव साळुंखे, अरुण गोंडे, अमर गोंडे, धीरज पवार आदी बंधू, भगिनी या सर्वांचे मनापासून आभार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही पोस्ट सुनेत्रा पवार यांनी केली आहे. बारामतीत यावेळी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळे या प्रचाराला उतरल्या आहेतच. शिवाय सुनेत्रा पवार यादेखील बारामती लोकसभा मतदारसंघात फिरुन लोकांशी संवाद साधत आहेत. अजित पवार यांनी तर बारामतीकरांना मी निवडणुकीला उभा आहे हे समजूनच मतदान करा असं म्हटलं आहे. अशात आता सुनेत्रा पवार यांच्या या फेसबुक पोस्टची चर्चा रंगली आहे.