धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अर्जना पाटील या लोकसभेच्या मैदानात आहेत. अर्चना पाटील यांनी आज (१९ एप्रिल) उमेदवारी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्यासमोर जाहीर नाराजी बोलून दाखवली. धाराशिव लोकसभा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेला आहे. यासंदर्भाने बोलताना तानाजी सावंत यांनी खंत बोलून दाखवली. “शिवसेनेचा असाच एक एक मतदारसंघ जर कमी होत राहिला तर आम्ही सहन करणार नाही”, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

तानाजी सावंत काय म्हणाले?

“आज येथे अजित पवार आहेत. भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील आहेत. थोडं परखड बोलतो. धाराशिवमध्ये महायुतीचा प्रचार हा जानेवारीमध्येच सुरु झाला आहे. २६ जानेवारीपासून धनंजय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. खरे तर हा मतदार पारंपारिक पद्धतीने शिवसेनेचा आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी धाराशिव मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला”, असे तानाजी सावंत म्हणाले.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ, तेव्हा तेव्हा समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण हा नंतरचा भाग आहे. त्याआधी जर असाच पद्धतीने माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हे सहन करणार नाही. हे आज या ठिकाणी सांगतो. याचे कारण हा मतदारसंघ पारंपारिक शिवसेनेचा आहे. ८ वेळा शिवसेनेचा खासदार येथून निवडून गेला आहे. त्यामुळे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. मात्र, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हे दु:ख विसरुन शिवसैनिकांना विनंती आहे की, अर्चना पाटील यांना आपल्याला लीड द्यायचे आहे”, असे तानाजी सावंत म्हणाले.