येत्या काही दिवसांतच देशाच्या गादीवर नवं सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापनेसाठी बहुमताची जुळवाजुळव सुरू असून एनडीएकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे करण्यात येणार आहेत. दरम्यान, देशाच्या गादीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बसल्यानंतर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती आणि कोणते खासदार असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणा आहे.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत संसदीय पक्षाचा नेता ठरवला जाणार आहे. त्यानंतर एनडीएची बैठक होऊन एनडीएच्या संसदीय पक्षाचा नेता निवडला जाईल. त्यानंतर ८ किंवा ९ तारखेला मोदींचा शपथविधी कार्यक्रम पार पडेल.

टीडीएस आणि जनता दलावर भिस्त

टीडीएस पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मु्ख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागण्यांचं पत्र पाठवलं आहे. या मागण्यांच्या पत्रात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. ज्यात, मंत्रिपदाचीही मागणी असण्याची शक्यता आहे. NDA मधील एकूण २५ पक्षांपैकी १४ पक्षांनी किमान एक जागा जिंकली आहे. २४० जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यानंतर तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि जनता दल (युनायटेड) यांनी सर्वाधिक जागा मिळवल्या. हे दोन्ही पक्ष एनडीए सरकारचे किंग मेकर मानले जात आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानेच एनडीएचे सरकार मजबूत राहू शकेल, असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं का?

तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ७ तर लोक जनशक्ती पक्षाने (रामविलास) ५ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय जनता दल (धर्मनिरपेक्ष), जनसेना पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल प्रत्येकी २ जागा जिंकून संसदेत पोहोचले आहेत. उर्वरित पक्षांना प्रत्येकी एकच जागा जिंकता आली. या सर्व पक्षांनी आपण नरेंद्र मोदींसोबत आहोत आणि एनडीएसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे लेखी स्पष्ट केले आहे.

मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलासाठी चर्चा सुरू

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाने एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला अंतिम करण्यासाठी मित्रपक्षांशी चर्चा सुरू केली असल्याची चर्चा आहे. त्याची जबाबदारी अमित शहा , राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे . एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीपूर्वी मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवला जाईल, असंही म्हटलं जात आहे.

हेही वाचा >> राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? उद्धव ठाकरे एनडीएत जाणार असल्याची चर्चा; नेते म्हणतात, “मोये मोये…”

पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्री?

नरेंद्र मोदी आता पहिल्यांदाच आघाडीचे सरकार चालवणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांना सोबत घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही पक्षात कोणत्याही प्रकारची कोंडी होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे. यासाठी संभाव्य मंत्र्यांची पार्श्वभूमी तपासली जात आहे. ५ खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्री करण्याचा फॉर्म्युला ठरवण्यात येत असल्याचे वृत्त आहे. हे सूत्र सर्व पक्षांना लागू केले जाईल. यावेळी राज्यमंत्र्यांची संख्या कमी होऊ शकते. केंद्र सरकारमध्ये ४५ पेक्षा जास्त मंत्रालये आहेत

नितीश कुमारांनी किती मंत्रीपदे मागितली?

नितीश कुमार यांनी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. याशिवाय १२ खासदारांपैकी तिघांना मंत्रिपद देण्याचीही मागणी केली आहे. नितीशकुमार यांना रेल्वे मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय हवे असल्याची चर्चा आहे. विशेषतः रेल्वे मंत्रालय हे त्यांचे पहिले प्राधान्य आहे. एनडीए सरकारचा अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थ मंत्रालय बिहारसाठी विशेष पॅकेज तयार करू शकते.

TDPचे चंद्राबाबू नायडूंची मागणी काय?

चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी पक्षाने १६ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे लोकसभेचं अध्यक्षपद मिळण्यासाठी टीडीपी प्रयत्न करत असल्याचं दि इकॉनॉमिक्स टाईम्सने वृत्त दिलं आहे. तसंच, ५ ते ६ महत्त्वाची मंत्रालयेही त्यांनी मागितली असल्याची चर्चा आहे. परिवहन मंत्री, ग्रामीण विकास, आरोग्य मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, कृषी, जलशक्ती, आयटी, दळणवळण, शिक्षण आणि वित्त मंत्रालय (MoS) या मंत्रालयांकडे टीडीपीचं सर्वाधिक लक्ष आहे. तसंच, काही अहवालांनुसार भाजपा आणि टीडीपी यांच्यात एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्री (MoS) पदांवर करार झाला आहे.

हेही वाचा >> “मला बावनकुळेंची काळजी वाटतेय”, फडणवीसांविषयी विचारल्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाले…

लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाने बिहारमधील पाचही जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे चिराग पासवान यांनी स्वत:साठी मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्रीपद मागितल्याचे वृत्त आहे. त्यांना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय किंवा रासायनिक खते मंत्रालय दिले जाऊ शकते, असे वृत्त आहे.

महाराष्ट्रात किती मंत्रिपदे मिळणार?

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडे केंद्रातील महत्त्वाचे सहकारी म्हणूनही पाहिले जात आहे. त्यांचा पक्ष शिवसेनेने लोकसभेच्या ७ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेने एनडीए सरकारमध्ये १ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री पदाची मागणी केल्याचं वृत्त आहे. तर, अजित पवार गटालाही एक जागा मिळणार असल्याची चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा स्वतःबरोबर किती मंत्रालये ठेवू शकतात?

दरम्यान, गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, रस्ते परिवहन मंत्रालय, कायदा मंत्रालय, सुरक्षा मंत्रालय भाजपा स्वतःकडे ठेवू शकते. तर, शिक्षण, आरोग्य, कॉर्पोरेट घडामोडी, माहिती आणि प्रसारण, शहरी विकास, गृहनिर्माण, जलसंपदा, महिला आणि बालविकास, रसायने आणि खते, अल्पसंख्याक व्यवहार, विज्ञान तंत्रज्ञान, भूविज्ञान, ग्राहक अन्न वितरण, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग , ग्रामीण विकास-पंचायती राज अशी नागरी उड्डाण मंत्रालये एनडीएच्या मित्रपक्षांना दिली जाऊ शकतात.