काँग्रेससोबत युती करण्याची आमची इच्छा होती आणि त्यामुळे आम्ही सकाळी ६ वाजता राहुल गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होतो, असा दावा तृणमूल काँग्रेसचे खासदार तथा ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच ही युती न होण्याला पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले. शनिवारी एका मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले अभिषेक बॅनर्जी?

“लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर युती करण्याची तृणमूल काँग्रेसची इच्छा होती. तसे नसते, तर आम्ही राहुल गांधी यांना भेटण्यासाठी सकाळी ६ वाजता त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेलो नसतो. खरं तर काँग्रेसशी युती न होण्याला काँग्रेसचे पश्चिम बंगालचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी जबाबदार आहेत. त्यांनी आमच्यावर अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका केली. मात्र, युतीच्या चर्चांवर परिणाम होऊ नये, म्हणून आमच्या पक्षाने त्यांना प्रत्युत्तर दिले नाही”, अशी प्रतिक्रिया अभिषेक बॅनर्जी यांनी दिली.

हेही वाचा – निवडणूक लढण्यास काँग्रेस उमेदवाराचा नकार; पक्षाकडून निधी नसल्याने मोहंती यांची असमर्थ…

“युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही काँग्रेसला पुरेसा वेळ दिला होता. मात्र, काँग्रेसने कोणताही प्रतिसाद दिला नाही. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आम्ही काँग्रेसच्या प्रतिसादाची वाट बघितली. मात्र, आम्ही अनिश्चित काळातसाठी काँग्रेसच्या प्रतिसादाची प्रतिक्षा करू शकत नव्हतो, कारण आम्हाला निवडणुकीची तयारी करायची होती”, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनीही दिली होती प्रतिक्रिया

महत्त्वाचे म्हणजे, ज्यावेळी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून मतभेद सुरू होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी ही युती संदर्भात प्रतिक्रिया दिली होती. “तृणमूल काँग्रेसबरोबर आमचे संबंध चांगल्या स्थितीत आहेत, थोड्या फार गोष्टी होत राहतात. त्यांचे नेते काही बोलताना, त्यावर आमच्या नेत्यांकडून उत्तर दिलं जातं. मात्र, असं असलं तरी याचा आमच्या मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही”, असे ते म्हणाले होते.

मागील निवडणुकांची आकडेवारी काय सांगते?

दरम्यान, तृणमूल काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीचा भाग असला तरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसकडून राज्यातील संपूर्ण ४२ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. मागील काही निवडणुकींतील आकडेवारीचा विचार केला, तर तृणमूल काँग्रेसला २००९ मध्ये ३१. २ टक्के मतं मिळाल होती. २०१४ मध्ये ती वाढून ३९.८ टक्क्यांपर्यंत तर २०१९ मध्ये ती ४३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.

हेही वाचा – ममता बॅनर्जींकडून लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा; नेमकं कारण काय? गेल्या निवडणुकीतील आकडेवारी काय सांगते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय काँग्रेसला २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत १३.५ टक्के मतं मिळाली होती. ही संख्या २०१४ मध्ये ९.७ टक्क्यांपर्यंत तर २०१९ मध्ये ५.६ टक्क्यांपर्यंत खाली आली. जागांचा विचार केला, तर पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी २००९ मध्ये काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाल होता, ही संख्या २०१४ मध्ये ४ तर २०१९ मध्ये २ जागांपर्यंत खाली आली. या तुलनेत तृणमूल काँग्रेसला २००९ मध्ये ३१. २ टक्के मतं मिळाल होती. २०१४ मध्ये ती वाढून ३९.८ टक्क्यांपर्यंत तर २०१९ मध्ये ती ४३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचली.