शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे नेहमी त्यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, भगिनी आणि मातांनो…अशाने करायचे. हाच पायंडा उद्धव ठाकरे यांनीही राबवला. मात्र, गेल्या काही दिवासंपासून उद्धव ठाकरे हिंदू शब्दाऐवजी देशभक्तांनो म्हणत आहेत. यावरून भाजपाकडून त्यांच्यावर टीका केली जातेय. इंडिया आघाडीत गेल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदूत्त्व सोडलं असल्याची भाजपाकडून लक्ष्य केलं जातेय. यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्यत्तर दिलं आहे. ते विक्रोळीतील जाहीर सभेत बोलत होते.
“बाकी किती कोणीही येऊद्या, यांना पराभवाचं भूत समोर दिसायला लागलं आहे. म्हणून ते राम राम करत आहेत. पण ज्यांच्यामुळे पराभव होणार आहे, त्या उद्धव ठाकरेंची यांना भीती वाटतेय. उद्धव ठाकरेंना संपवण्याकरता रणगाडे, रॉकेट्स आणि अणूबॉम्ब आणायचे राहिले आहेत. पूर्वी मोदी म्हणायचे की मे ऐकेला सबपे भारी. आता म्हणतात सबलोक मुझे खतम करने आये ए है”, असं ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> “मुस्लिमांकडे जेवल्यानंतर गोवंश हत्याबंदी कशी केली?” ठाकरेंचा मोदींना उपरोधिक टोला; म्हणाले, “मी ताजिया मिरवणुकीत…”
“विश्वगुरू तुम्ही आणि तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती वाटते कसलीशक्ती तुमची? आम्ही देशभक्त म्हणून पुढे जातोय. मी हिंदुत्त्वाला नाही सोडलं, मी लाथ मारलीय भाजपाला. पण जे आपल्या शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, भगिनी आणि मातांनो….हे सोडलेलं नाही. देशाची लढाई आहे म्हटल्यावर देशभक्त म्हणणार. आम्ही देशभक्त नाही? म्हणून मी फडणवीसांना सांगतो, ज्या कोणाला देशभक्त शब्दावर आक्षेप असेल तर ते देशद्रोही आहेत. पहिलं त्यांना गेटाउट सांगितलं पाहिजे”, असा इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्र अफगाणिस्तानात आहे का?
“महाराष्ट्रातले सर्व उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत. यावरून प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणतात की गुजरात पाकिस्तानात आहे का? माहिती आहे आम्हाला की गुजरात आमचाच आहे. आपल्या देशाचं अविभाज्य राज्य आहे. पण महाराष्ट्राचं ओरबाडून तुम्ही नेत आहात, महाराष्ट्रात जसा गुजरात हा पाकिस्तानात आहे का असा प्रश्न विचारात आहात, तसा माझा महाराष्ट्र अफगाणिस्तानात आहे का? शाहू, फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र शाहा, मोदी आणि अदाणींचा होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. जे जे आमच्याशी मस्तीत वागतील, त्यांची मस्ती कशी जिरवायची हे आमच्या मर्द शिवसैनिकांना चांगलंय माहितेय”, असंही ते म्हणाले.