उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारला आणखी एक झटका बसला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर भाजपा सरकारमधील आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान यांनी राजीनामा दिला आहे. चौहान हेसुद्धा स्वामींप्रमाणेच ओबीसी समाजातील होते.

वन आणि पशु फलोत्पादन मंत्री दारा सिंह चौहान यांनी राज्यपालांना आपल्या राजीनाम्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. “माझ्या विभागाच्या भल्यासाठी मी मनापासून काम केले, पण योगी सरकारच्या मागासलेल्या, दलित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुणांप्रती योगी सरकारच्या घोर उपेक्षित वृत्तीसोबतच मागासलेल्या, दलितांच्या आरक्षणाबाबत होत असलेल्या गोंधळामुळे मी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे, असे दारा सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याप्रमाणे दारा सिंह चौहान हे देखील भाजपामध्ये येण्यापूर्वी बहुजन समाज पक्षाचे (बसपा) नेते होते. २०१५ मध्ये त्यांनी बसपा सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. तीन वेळा खासदार राहिलेल्या चौहान यांना भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपाचे सदस्यत्व दिले होते. चौहान यांना ओबीसी मोर्चाचे अध्यक्षही करण्यात आले होते. मधुबन विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर त्यांना योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले होते. मात्र आता निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

दारा सिंह चौहान यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांना या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. “कुटुंबातील एखादा सदस्य चुकला तर खूप त्रास होतो. निघालेल्या आदरणीय मान्यवरांना माझी एवढीच विनंती आहे की बुडत्या बोटीवर स्वार होऊन नुकसान त्यांचेच होईल. मोठे भाऊ श्री दारा सिंह जी, तुम्ही तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा,” असे केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी कामगार आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अन्य तीन आमदारांनीही भाजपाचा राजीनामा देत मौर्य यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, मंगळवारी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विटरवर माजी मंत्र्यासोबतचे स्वतःचे छायाचित्र शेअर करून त्यांचे सपामध्ये स्वागत केले. मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर बांदा जिल्ह्यातील तिंदवारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार ब्रिजेश कुमार प्रजापती, शाहजहानपूर जिल्ह्यातील तिल्हार विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोशन लाल वर्मा आणि कानपूर देहाटच्या बिल्हौर मतदारसंघाचे आमदार भगवती सागर यांनीही भाजपाचा राजीनामा दिला आहे.