घराणेशाहीची परंपरा असलेल्या पक्षांमध्ये घराण्यातील प्रभावी नेता कोण, त्याचा उदोउदो केला जातो. समाजवादी पक्षात मुलायमसिंग यादव ‘नेताजी’ यांची चलती असताना नेताजींना महत्त्व होते. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वत:कडे घेतल्यापासून त्यांचा उदोउदो सुरू झाला. उमेदवारीवाटपात कोणाचा शब्द चालतो, हे बघून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेत्याला महत्त्व देतात. काँग्रेसमध्ये गांधी घराणे म्हणजे कार्यकर्त्यांचे बलस्थान. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून राहुल गांधी यांचे नाव निश्चित केले आहे. यानुसार कार्यकर्त्यांनी राहुल यांचा जयजयकार सुरू केला. पण, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळत नाही, असे चित्र निर्माण झाले. सत्तेविना गप्प बसणे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या रक्तातच नाही. एखाद्या निवडणुकीत अपयश आले तरी पुढील निवडणुकीनंतर सत्ता मिळेल, या आशेवर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते होते. राहुल यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा लक्षात घेता पुढील निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळेल का याबाबत पक्षातच साशंकता व्यक्त केली जाऊ लागली. प्रकृती साथ देत नसल्याने सोनियांवर आलेल्या मर्यादा, राहुल यांचे नेतृत्व सातत्याने अपयशी ठरणे या पाश्र्वभूमीवर काँग्रेसजनांना प्रियंका गांधी-वढेरा यांच्याबद्दल अपेक्षा आहेत. प्रियंका राजकारणात सक्रिय झाल्यास पक्षाला चांगले दिवस येतील, असा अंदाज पक्षात व्यक्त केला जातो. पण, राहुल यांचे नेतृत्व पुढे यावे यासाठी सोनिया या प्रियंका गांधींना पुढे येऊ देत नाहीत, अशी चर्चा सुरू असते. सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमुळे हवा तापली आहे. मुलायमसिंग आणि अखिलेश यादव या पिता-पुत्रातील यादवीत पक्ष फुटीच्या उंबरठय़ावर होता. अखिलेश यांनी सावधगिरी म्हणनू काँग्रेसची हातमिळवणी करण्याची तयारी दर्शविली. पण जागावाटपावरून पुन्हा अडले. काँग्रेसचे सध्या आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाने उमेदवार जाहीर केले. आघाडीबाबत साशंकता निर्माण झाली असताना प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतला. प्रियंका यांचे निकटचे मानले जाणारे धीरज श्रीवास्तव लखनौत दाखल झाले. प्रियंका यांनी पुढाकार घेतल्याने राहुल गांधी फारसे महत्त्व देत नसलेल्या नेत्यांना गुदगुल्या झाल्या. अहमद पटेल यांनी केलेल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे नमूद केले. राहुल गांधी यांचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्याचे प्रयत्न झाले. राहुल यांचे महत्त्व कमी करून प्रियंका यांचा उदोउदो सुरू झाला ही बाब राहुल यांच्यासाठी तापदायक ठरणारी होती. मग सोनियांच्या मध्यस्थीने आघाडीचा मार्ग मोकळा झाला, अशी सारवासारव काँग्रेसने केली. प्रियंका आज ना उद्या राजकारणात सक्रिय होणार हा संदेश काँग्रेसजनांमध्ये गेला आहे.