उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराने वेग घेतल्याचे दिसत आहे. महाराजगंज येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बसप प्रमुख मायावती आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशाने ‘हावर्ड’ व ‘हार्डवर्क’चा वैचारिक स्तर काय असतो तो पाहिलं आहे. नोटाबंदीनंतर देशातील जीडीपीत वाढ झाल्याचा संदर्भ देत ते म्हणाले, एकीकडे ते हार्वर्डची गोष्ट करतात आणि दुसरीकडे गरीबाचा मुलगा हार्डवर्क करून देशाची अर्थव्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करत आहे, असा टोला लगावला.

राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले, काँग्रेसचे एक नेते मणिपूरमध्ये जाऊन सांगतात की, आम्ही येथील नारळाचा ज्यूस लंडनमध्ये जाऊन विकू. पण गरीबातील गरीब मुलाला ही माहीत आहे की, नारळाचा ज्यूस नसतो तर पाणी असते. ज्यूस हे फक्त संत्री, लिंबूचं असतं. नारळाचा ज्यूस असतो, का असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थितांना केला. नारळ केरळमध्ये मिळते. परंतु हे मणिपूरमध्ये नारळाचा ज्यूस काढणार आहेत, असा उपरोधात्मक टोलाही दिला.
या वेळी मोदी यांनी निवडणुकीतील ५ टप्प्यात भाजपनेच आघाडी घेतली असून यूपीची जनता आता परिवर्तन करणार आहे. १५ वर्षे त्यांनी खूप सहन केले. ज्यांनी यूपीच्या लोकांना लुटले त्याचा ते बदला घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. मोदी म्हणाले, केंद्राने विजेसाठी निधी दिला. परंतु यूपी सरकारने ते खर्च केले नाहीत. त्यामुळेच आज यूपीतील गरीब आजही अंधारात चाचपडत असतो, असे ते म्हणाले.
मायावतींवर टीका करताना ते म्हणाले, मी स्वच्छ भारत अभियानाची भारतात सुरूवात केली. परंतु यूपीतील लोकांनी येथील राजकारणातील स्वच्छताही करण्यास आम्हाला सांगितले आहे. मागील पाच टप्प्यातील मतदानास लोकांनी भाजपला मोठा प्रतिसाद दिला असून तोच पक्ष विजयी होईल इतकंच नव्हे तर येथील लोकांनी आम्हाला सहावा आणि सातवा टप्पा बोनस म्हणून देत आहेत. यूपीच्या वेबसाइटबाबत बोलताना ते म्हणाले, वेबसाइटवर लिहिले आहे, ‘Life in Uttar Pradesh is short’ असं लिहिलं आहे. याचा संदर्भ देत ते म्हणाले, उत्तर प्रदेशची परिस्थितीही सहारा वाळवंटासारखी झाली असल्याची टीका त्यांनी केली.