महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे. शिंदे गटाने राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना येथून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाला मिळाली असून ठाकरे गटाने येथून चंद्रकांत खैरेंना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिक भिडणार आहेत. या मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध एमआयएमचे खासदार (औरंगाबादचे विद्यमान खासदार) इम्तियाज जलील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंबरोबरच थांबले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघात लोकसभेसाठी नवा उमेदवार शोधावा लागला. त्यामुळे अनेक नेते संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गटाचं दार ठोठावत होते. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटीलदेखील यासाठी प्रयत्नशील होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना बाजूला करत संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, विनोद पाटील छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना संदेश पाठवला आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही येथील तुमचा उमेदवार बदलायला हवा. विनोद पाटील यांनी यासंदर्भात सोमवारी (२२ एप्रिल) नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तर, रात्री उशिरा त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंतांची भेट घेतली. या भेटीत उदय सामंतांना विनोद पाटील यांची समजूत काढण्यात फारसं यश आलेलं दिसत नाही. त्यामुळे विनोद पाटील आता मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. मुख्यमंत्री आज बुलढाणा दौऱ्यावर आहेत. बुलढाण्यावरून परत येताना ते छ. संभाजीनगर येथे विनोद पाटील यांना भेटणार आहेत. या भेटीत मुख्यमंत्री विनोद पाटील यांची समजूत काढणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, विनोद पाटलांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, विनोद पाटील यांची टीम खूप मजबूत आहे आणि आम्हाला त्याची कल्पना आहे. आमच्यात काय चर्चा झाली त्याची माहिती मी प्रसारमाध्यमांना देणार नाही. मी यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.

हे ही वाचा >> “रोहितच्या उमेदवारीला शरद पवारांचा विरोध, पण मीच…”, अजित पवारांच्या दाव्यावर रोहित पवार म्हणाले…

विनोद पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे उमेदवार बदलण्याची विनंती

सामंतांच्या भेटीनंतर विनोद पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले, आपण राज्यातील राजकीय परिस्थितीचं भान ठेवून अनेक ठिकाणी बदल केले आहेत. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये तातडीने सर्वेक्षण करावं. त्या सर्वेक्षणात सर्वसामान्य जनता माझ्या बाजूने नसेल तर आपण त्यावर चर्चा करू शकतो. परंतु, मला पूर्ण विश्वास आहे की, संभाजीनगरची जनता माझ्या बाजूने आहे. जिल्ह्यातील अठरापगड जातीचे तरुण माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी माझी भूमिका ठामपणे मांडली आहे. उलट मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, आपणच उमेदवार बदलावा आणि एक खासदार पंतप्रधान मोदींकडे पाठवण्यासाठी सहकार्य करावं.