स्टेल्थ पाणबुडी म्हणजे काय?

आयएनएस करंज ही १० मार्च २००८ रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली कलवरी वर्गातील डिझेल व विजेवर चालणारी तिसरी स्टेल्थ पाणबुडी आहे. स्टेल्थ म्हणजे अशा प्रकारचा धातू की, जो शोधक यंत्रणांची प्रारणे शोषून घेतो किंवा बाहेर फेकून तरी देतो. त्यामुळे स्टेल्थ युद्धनौका किंवा पाणबुड्यांचा शोध घेणे कठीण जाते. शिवाय त्यांच्या बाह््य रचनांमध्येही स्टेल्थ रचनांचा वापर केलेला असतो. त्यामुळे काटेकोर कोन असलेली रचना स्टेल्थमध्ये नसते. त्यामुळे शत्रूच्या रडार किंवा सोनारला चकवा देण्याची क्षमता त्यांना प्राप्त होते. रडार हे सामान्य वातावरणात, तर सोनार हे पाण्याखाली कार्यरत असते. सध्या जगात असलेल्या पाणबुड्यांमध्ये नवीन ‘आयएनएस करंज’ ही अत्याधुनिक अशी पाणबुडी आहे.

करंजची बांधणी

नवीन करंजच्या बांधणीला माझगाव गोदीमध्ये २९ ऑगस्ट २००८ रोजी स्टील कापून सुरुवात करण्यात आली तेव्हा ‘यार्ड क्रमांक ११८७७’ हा तिचा परिचय होता. ही स्कॉर्पिन पाणबुडी असून तिचे बांधणी तंत्र फ्रेंच कंपनीने विकसित केले आहे. कमीत कमी वेळेत बांधणी करता यावी, यासाठी मोड्युलर तंत्राचा वापर करून पाच भागांमध्ये बांधणी आणि नंतर जुळणी अशी रचना करण्यात आली. युद्धनौकांच्या जुळणीपेक्षाही पाणबुडीची जुळणी अधिक कठीण मानली जाते. समुद्रतळाशी दाब अधिक असतो, त्या वातावरणातही तिची जोडणी तुटणार नाही किंवा त्याला तडे जाणार नाहीत, अशी पक्की असावी लागते. त्यासाठी माझगाव गोदीतील वेल्डर्सना सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये नेऊन खास प्रशिक्षण देण्यात आले. ‘करंज’चे वेल्डिंगचे अतिमहत्त्वाचे काम २०१६ साली नोव्हेंबर महिन्यात पार पडले.

महाराष्ट्राच्या किनाऱ्याशी नाते

‘करंज’चा नामकरण समारंभ ३१ जानेवारी २०१८ रोजी पार पडला. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर सापडणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या देवमाशाला कोळीबांधव करंज असे म्हणतात. ‘आयएनएस करंज’च्या बोधचिन्हावरही दिशा दाखविणाऱ्या होकायंत्राच्या बाजूला हा देवमासा विराजमान आहे. २ जानेवारी २०१८ पासून ‘करंज’च्या सागरी चाचण्यांना सुरुवात झाली. २०१६ सालीच या पाणबुडीवरील नौसैनिकांची निवड होऊन त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. विद्यमान ‘आयएनएस करंज’ ही कलवरी वर्गातील कलवरी, खंदेरीनंतरची तिसरी पाणबुडी आहे. मात्र यापूर्वीच्या दोन्ही पाणबुड्यांची निर्मिती ही फ्रेंच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली झाली होती, तर विद्यमान ‘करंज’ ही पूर्णपणे भारतीय नजरेखाली तयार झालेली पहिलीच पाणबुडी आहे.

ऊर्जायंत्रणेचे वैशिष्ट्य

येणाऱ्या काळात पाणबुडीचा ऊर्जास्रोत असलेल्या प्रोपल्शन यंत्रणेमध्येही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. भारतीय संरक्षण व विकास संस्था डीआरडीओने इंधन संचावर चालणाऱ्या एअर प्रोपल्शन यंत्रणेची निर्मिती केली असून तिच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचे मंगळवारीच जाहीर केले. येणाऱ्या काळात कलवरी वर्गातील स्टेल्थ पाणबुड्यांवर ही यंत्रणा बसविण्यात येईल. त्यामुळे या यंत्रणेमुळे पाणबुड्या दीर्घकाळ पाण्याखाली राहू शकतील.

आकारमान

आयएनएस करंज ६७.५ मीटर्स लांब असून तिची उंची १२.३ मीटर्स आहे. तिचा पाण्याखाली असणारा भाग ५.८ मीटर्सचा आहे. पाण्यावर अस्तानाचे तिचे वजन १६१५ टन, तर पाण्याखालचे तिचे वजन १७७५ टन असते.

शस्त्रसंभार

आयएनएस करंजवर पाणतीर, युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र आणि पाणसुरुंग असा शस्त्रसंभार सज्ज आहे.

बांगलादेश युद्धात कामगिरी

आयएनएस करंजच्या पहिल्या आवृत्तीवर १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धामध्ये कराची बंदराची यशस्वी नाकाबंदी केली होती. त्या नाकाबंदीमुळे पाकिस्तानी युद्धनौका आणि पाणबुड्यांना बंदर सोडणेच अशक्य झाले. त्यांना बंदराबाहेरच पडता आले नाही. शिवाय भारतीय नौदलाच्या माऱ्यामध्ये काहींना जलसमाधीही मिळाली आणि पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. हे घडले त्या वेळेस पाणबुडीचे नेतृत्व कॅप्टन व्ही. एस. शेखावत यांच्याकडे होते. ते नंतर १९९३ साली भारतीय नौदलाचे प्रमुख झाले. पाणबुडीचे नेतृत्व करणारे ते भारताचे एकमेव नौदलप्रमुख आहेत.

पहिली ‘करंज’ आणि कॅप्टन सामंत

पहिली ‘आयएनएस करंज’ ४ सप्टेंबर १९६९ रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. त्याचा समारंभ रशियन गोदीमध्ये पार पडला. या पहिल्या ‘आयएनएस करंज’चे नेतृत्त्व कॅप्टन मोहन नारायणराव सामंत यांनी केले. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. मोहन सामंत हे १९७१ साली पूर्व पाकिस्तानातील (बांगलादेश) युद्धासाठी भारतीय नौदलाने खास तयार केलेल्या युनिटचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश युद्धातील अनेक कारवाया छुप्या पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडल्या. या युद्धासाठी तब्बल ४०० बंगाली युवकांना त्यांनी युद्ध प्रशिक्षण दिले आणि छुप्या कारवाया घडवून आणल्या.