News Flash

समजून घ्या : ‘सॉफ्ट सिग्नल’ म्हणजे काय?; का आहे या नियमाला क्रिकेटमध्ये एवढं महत्व?

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यामधील दोन निर्णय सॉफ्ट सिग्नलच्या आधारे भारताच्याविरोधात देण्यात आले

नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकणार ही या मालिकेतील प्रथा भारताने अहमबादमधील मैदानावर झालेल्या सामन्या गुरुवारी मोडीत काढत प्रथम फलंदाजी करुन सामना जिंकला. भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये २-२ अशी बरोबर करण्यात यश मिळवलं ते सूर्यकुमार यादवच्या दमदार खेळीच्या जोरावर. भारताने इंग्लंडविरुद्धचा चौथा सामना आठ धावांनी जिंकल्याने पाचवा टी-२० सामना मालिका कोण जिंकणार हे ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. मात्र या चौथ्या सामन्यादरम्यान तिसरे पंच विरेंद्र शर्मा यांनी दिलेले काही निर्णय सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरले. खास करुन चांगली फलंदाजी करत असणाऱ्या सूर्यकुमारचा झेल हा सॉफ्ट सिग्नलच्या आधारावर तसेच कनक्युजीव्ह एव्हिडन्सच्या आधारावर योग्य असल्याचा निर्णय दिल्याने शर्मा यांच्यावर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी चांगलीच टीका केली. या निर्णयानंतर सॉफ्ट सिग्नल हा विषय ट्विटरच्या टॉप ट्रेण्डमध्ये आला. मात्र सॉफ्ट सिग्नल म्हणजे नेमकं काय हे अनेकांना ठाऊक नाहीय. त्यामुळेच या लेखामध्ये आपण या नियमासंदर्भात जाणून घेणार आहोत.

सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?

जेव्हा मैदानावरील पंचांना सामन्यातील एखादा झेल योग्य पद्धतीने पकडला आहे की नाही या संदर्भातील निर्णय घेण्यासाठी काही वेळेस पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतात. मात्र अशा प्रकरणांमध्ये मैदानावरील पंचांना प्राथमिक अंदाजानुसार फलंदाज बाद आहे की नाबाद याबद्दल त्यांना काय वाटतं हे तिसऱ्या पंचांना कळवावं लागतं. म्हणजेच मैदानावरील पंच फलंदाज बाद की नाबाद हे अंदाजाने ठरवतो आणि तो निर्णय योग्य आहे की नाही याबद्दल अंतिम निर्णय देण्याची जबाबदारी तिसऱ्या पंचांकडे सोपवतो. त्यामुळेच जेव्हा मैदानावरील पंच जेव्हा तिसऱ्या पंचाकडे निर्णय घेण्यासंदर्भात मदत मागतात तेव्हा तिसरे पंच त्यांना तुम्हाला काय वाटतं असं विचारतात. त्यावेळी पंच जो निर्णय देतात (बाद की नाबाद) त्याला सॉफ्ट सिग्नल असं म्हणतात.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती म्हणजेच आयसीसीच्या नियमांनुसार मैदानावरील पंचाने दिलेला हा निर्णय तिसरा पंच तेव्हाच बदलू शकतो जेव्हा त्याला कनक्युजीव्ह एव्हिडन्स म्हणजेच ठोस निर्णय घेण्यासंदर्भातील पुरावा फुटेजमध्ये सापडतो. सूर्यकुमार यादवच्या प्रकरणामध्ये मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल देताना तो बाद असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळेच विरेंद्र शर्मा यांना मैदानावरील पंचांचा निर्णय बदलण्यासाठी डेव्हिड मालनने पकडलेला चेंडू खरोखरच जमीनीला टेकला आहे की नाही यासंदर्भातील निर्णय घ्यावा लागणार होता. मात्र अनेकदा फुटेज तपासून पाहिल्यानंतरही तिसरे पंच असणाऱ्या शर्मा यांनी सबळ पुरावा नाही असं म्हणत मैदानावरील पंचांचा सूर्यकुमारला बाद देण्याचा निर्णय कायम ठेवला.

असंच पुन्हा वॉशिंग्टन सुंदरचा सीमेरेषेजवळचा झेल पकडतानाही झालं. पंचांनी सुंदर बाद असल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला होता. त्यामुळे झेल पकडताना सीमारेषेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूची टाच लागली याबद्दलचा ठोस पुरावा न मिळाल्याने सुंदरला मैदानावरील पंचांच्या सॉफ्ट सिग्नलनुसार बाद ठरवण्यात आलं.

एवढं तंत्रज्ञान असताना सॉफ्ट सिग्नल का?

क्रिकेटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान वापरलं जात असतानाही मैदानावरील पंचाकडून सॉफ्ट सिग्नलची गरज का असते असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. सूर्यकुमारच्या प्रकरणामध्ये प्रत्येक भारतीयाला चेंडू जमीनीला टेकल्याचं वाटतं होतं. मात्र या सामन्यामध्ये पंच असणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं याचा विचार करणंही निर्णय देताना अधिक महत्वाचं असतं. सर्व तंत्रज्ञान आणि पर्यांयांचा वापर करुनही ठोसपणे सांगता येत नसेल तर तिसरे पंच लोकप्रिय निर्णय देण्याऐवजी सामन्यामध्ये मैदानात उपस्थित असणाऱ्या पंचांना काय वाटतं या गोष्टीला जास्त महत्व देतात. त्यामुळेच मैदानावरील पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल महत्वाचा ठरतो.

या सॉफ्ट सिग्नल प्रकरणामधील सर्वात मोठा गोंधळ हा व्हिडीओ द्विमितीय म्हणजेच टू डायमेन्शनल असतो. मात्र असे महत्वाचे निर्णय हे त्रिमितीय म्हणजेय थ्री डायमेन्शनल म्हणजे चेंडू जमीनीपासून वर होता की नाही वगैरेसारख्या गोष्टींवर अवलंबून असतात. व्हिडीओमध्ये या गोष्टीला बंधनं येत असल्यानेच पंच किमान दोन ते कमला तीन चार बाजूने वादग्रस्त झेल पाहतात आणि मगच निर्णय देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 8:54 am

Web Title: explained india vs england t 20 what is soft signal why it is important scsg 91
Next Stories
1 समजून घ्या : सात बँकांचे IFSC कोड १ एप्रिलपासून बदलणार; खातेदारांना काय करावं लागणार?
2 समजून घ्या सहजपणे : आयएनएस ‘करंज’ची गाज
3 समजून घ्या सहजपणे : ‘व्हॉट्सअ‍ॅप’मध्ये नेमका काय बदल?
Just Now!
X