– डॉ. भरेश देढिया

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होण्याचे संकट सध्या झपाट्याने पसरत असल्याने रुग्णांचे विलगीकरण केले जात असल्याचे वृत्त वारंवार ऐकू येत असेल. परंतु, रुग्णाचे विलगीकरण म्हणजे नेमके काय?

विलगीकरण म्हणजे संसर्गजन्य आजाराच्या प्रकारानुसार, इतरांशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क येण्यापासून स्वतःला दूर ठेवणे. सामाजिक अलिप्तता राखल्याने व विलगीकरण केल्याने या विषाणूचा संसर्ग इतर व्यक्तींनाही होण्याची शक्यता कमी होते. साधारणतः,  कोव्हिड-19 साठी विलगीकरण म्हणजे 14 दिवस इतरांपासून वेगळे राहणे आणि कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची लक्षणे आढळल्यास या लक्षणांची व आरोग्याची बारकाईने पाहणी करणे.

कोव्हिड-19 प्रदूर्भावामुळे निर्माण झालेली सध्याची परिस्थिती विचारात घेता, लोकांचे निरनिराळ्या प्रकारे विलगीकरण करता येऊ शकते. संसर्ग झालेल्या व्यक्तींचेच केवळ विलगीकरण करावे, असे नाही. हा विषाणू संक्रमित करतील, असा संशय असणाऱ्या किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही विलगीकरणाचा विचार करावा.

कोणताही प्रवासी भारतात दाखल झाला की त्याच्यामध्ये विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसत आहेत का, हे तपासले जात आहे. भारतात प्रवेश केलेल्या संबंधित प्रवाशामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तर त्या व्यक्तीला कटाक्षाने घरामध्ये विलगीकरण करण्याचा सल्ला दिला जात आहे, तसेच ताप, कोरडा खोकला, घशाला सूज व धाप लागणे अशी कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने सूचित करण्यास सांगितले जात आहे. यालाच घरामध्ये विलगीकरण (होम क्वारंटाइन) असे म्हटले जाते. परंतु, भारतात प्रवेश केल्यावर व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे आढळली तर त्या व्यक्तीला सरकारने निश्चित केलेल्या विलगीकरण केंद्रावर पाठवले जाते. तेथे, थ्रोट स्वॅबद्वारे व्यक्तीची कोव्हिड-19 चाचणी केली जाते. ही चाचणी सकारात्मक आली तर संबंधित व्यक्तीला कठोर वैद्यकीय निरीक्षणाखाली व विलगीकरण केंद्रात ठेवले जाते. चाचणी नकारात्मक असेल तर संबंधित व्यक्तीला विलगीकरण केंद्रात ठेवले जाऊ शकते किंवा 14 दिवस घरामध्ये विलगीकरण करण्याची सूचना दिली जाऊ शकते.

काही देशांमध्ये, कोव्हिड-19 पॉझिटिव्ह ठरलेल्या रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची किंवा अजिबात लक्षणे दिसत नसल्यास अशा रुग्णांनाही घरामध्ये स्वतःचे विलगीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रामुख्याने, वैद्यकीय सेवा अपुऱ्या पडत असताना हा निर्णय घेतला जात आहे.

घरामध्ये विलगीकरण करत असताना, विषाणूचा संसर्ग घरामध्ये होऊ नये यासाठी संबंधित व्यक्तीने अनेक प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील इतर व्यक्तींना थेट स्पर्श करू नये, तसेच संशयित रुग्णाला स्वतंत्र खोली दिल्यास अधिक योग्य ठरेल. या खोलीमध्ये स्वतंत्र बाथरूम असल्यास चांगले. संशयित रुग्णाचा टॉवेल, बेड, खाण्याचे ताट, चमचा इतर कोणीही वापरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. ही काळजी 14 दिवस घेणे गरजेचे आहे.

कोव्हिड-19 सकारात्मक असलेल्या रुग्णाला रुग्णालयामध्ये जेव्हा दाखल केले जाते तेव्हा त्या व्यक्तीला एका स्वतंत्र निगेटिव्ह प्रेशर खोलीमध्ये ठेवले जाते. व्यक्तीच्या कुटुंबीयांना काचेच्या दारातून किंवा खिडकीतून या व्यक्तीला पाहता येऊ शकते. मात्र, कुटुंबीयांपैकी कोणाला या व्यक्तीला भेटायचे असल्यास त्यांना संशयित रुग्णाच्या खोलीमध्ये जात असताना N95 मास्क, ग्लोव्ह, आय-शिल्ड, गाऊन अशी पर्सल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) घालण्यास सांगितले जाते. तसेच, या खोल्यांमध्ये पीपीई घालण्यासाठी सहसा अँटि-चेंबर्स असतात, जेणे करून संशयित रुग्णाची खोली कॉरिडॉरपासून वेगळी ठेवली जाते.

या व्यतिरिक्त, अन्नधान्याच्या सेवनाच्या बाबतीत रुग्णांनी कोणतेही निर्बंध पाळण्याची आवश्यकता नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(लेखक क्रिटिकल केअर विभाग प्रमुख, हिंदूजा हॉस्पिटल, खार आहेत)