पँगाँग टीएसओ सरोवराच्या परिसरात भारत आणि चीनमध्ये सैन्य माघारीची सुरु झालेली प्रक्रिया हे पहिलं पाऊल आहे. चीनचं अतिक्रमण आणि हेकेखोरपणामुळे सीमेवर बिघडलेलं वातावरण आता कुठे शांत, स्थिर होईल, अशी चिन्ह दिसू लागली आहेत. दोन्ही देशांच्या मनात परस्परांबद्दल अविश्वासाची भावना इतकी प्रचंड आहे की, सैन्य माघारीच्या प्रत्येक पावलावर ठरल्यानुसार घडलंय का? हे वारंवार तपासावं लागणार आहे.

भारताने चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत
पूर्व लडाख सीमेवर आता जी परिस्थिती बदलतेय, त्यामागे मुत्सद्दी आणि सैन्य पातळीवरुन चीन बरोबर निरंतर सुरु असलेली चर्चा एक कारण आहे. चीनने जिथे, जिथे मानसिक दबाव टाकण्याची खेळी केली, भारताने त्या प्रत्येक ठिकाणी चीनला त्याच पद्धतीचे प्रत्युत्तर दिले. पण हे सर्व सुरु असताना, भारताने चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत.
लडाखमध्ये ज्या भागांमध्ये संघर्षाची स्थिती उदभवली होती, तिथे लष्करी पातळीवर चर्चा सुरु होतीच, पण त्याचवेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या देखरेखीखाली सहसचिव नवीन श्रीवास्तव यांचं सुद्धा मुत्सद्दी पातळीवर बोलणं सुरु होतं.

भारताने घाई केली नाही
चर्चेतून लगेच काही निष्पन्न होईल, याची आम्ही अजिबात घाई केली नाही.  दीर्घकाळाच्या दृष्टीने आमची रणनिती होती. थंडीचा मोसम सुरु होतोय, म्हणून त्याआधी फलनिष्पत्तीचा आग्रह आम्ही धरला नव्हता, असे दुसऱ्या सूत्राने सांगितले. पररराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचा खुबीने वापर केला. चांगल्या द्वपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता आणि स्थिरता आवश्यक आहे, हा संदेश ते चीनपर्यंत पोहोचवत राहिले.

चीनकडे उत्तरचं नव्हतं
पूर्व लडाखमधल्या आपल्या कृतीबद्दल चीनला योग्य उत्तर देता आलं नाही. चीनला आपली बाजूचं पटवून देता आली नाही. या उलट दुसऱ्या बाजूला भारत द्विपक्षीय नियम आणि करारांचे पालन करा, असेच सांगत होता.

भारताने आर्थिक दणका दिला
चीन सीमेवर सैन्य शक्ती दाखवत असताना भारताने द्विपक्षीय संबंधांची पर्वा न करता चीनला आर्थिक, व्यावसायिक दणका देणारे निर्णय घेतले. अ‍ॅप बंदी, चिनी कंपन्यांची कंत्राट रद्द करणं, यामुळे चीनच्या भारतातील व्यावसायिक हितांना आर्थिक फटका बसत होता. रणनितीक दृष्टीने भारताने चीनचे सख्य नसलेल्या देशांबरोबर मैत्रीसंबंध दृढ करण्यास सुरुवात केली.क्वाड हे त्याचेच एक उदहारण. नौसेनच्या मालाबार युद्ध सरावात ऑस्ट्रेलियाचा समावेश केला. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे चार देश क्वाडच्या माध्यमातून एकत्र आले. तो सुद्धा चीनसाठी एक झटका होता.

एअर फोर्स आणि सैन्याची तैनाती
चीन आपली सैन्य शक्ती दाखवत असताना भारतही गप्प बसला नाही. पूर्व लडाखपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत भारताने चीनच्या तोडीस तोड सैन्य तैनाती केली. लडाखमध्येच भारताचे ५० हजार सैनिक तैनात आहेत, त्याशिवाय इंडियन एअर फोर्सनेही कमीत कमी वेळात कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले. मुत्सद्दी, आर्थिक असो वा लढाईचं मैदान प्रत्येक ठिकाणी भारताने आपल्या कृतीतून आम्ही बधणार नाही, हा चीनपर्यंत स्पष्ट संदेश पोहोचवला. गलवानमध्ये चीनने जे करण्याचा प्रयत्न केला, त्याला भारतीय सैन्यानेही तसेच प्रत्युत्तर दिले. चीनसाठी तो सुद्धा एक झटका होता.

चीनला प्रत्यक्ष युद्धापेक्षा मानसिक युद्ध लढण्यात जास्त मजा येते. यावेळी भारताने त्यांना प्रत्येक आघाडीवर तशाच प्रकारच उत्तर दिलं. नऊ महिन्यानंतरही अखेर तिढा सुटत नसल्यामुळे त्यांच्याकडे भारताची भूमिका मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. पँगाँग सरोवर परिसरातील माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४८ तासात दोन्ही देशांमध्ये पुढच्या फेरीची चर्चा होईल. यामध्ये लडाखचा देपसांग भाग महत्त्वाचा आहे. इथे चिनी सैन्याने भारतीय जवानांचा गस्त घालण्याचा मार्ग रोखला आहे.