झटपट संवादाचे लोकप्रिय माध्यम बनलेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या धोरणात करण्यात आलेल्या बदलांच्या चर्चेने वापरकत्र्यांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपमधील धोरणबदल म्हणजे काय, त्यांचा वापरकत्र्यांवर काय परिणाम होणार, आपल्या खासगीपणावर अतिक्रमण होणार का, असे प्रश्न वापरकत्र्यांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. यातूनच गेल्या काही दिवसांपासून अफवांनाही ऊत आला आहे. नव्या धोरणांद्वारे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या संवादांवर लक्ष ठेवणार, आपले संदेश सरकारी यंत्रणांनाही समजणार अशा प्रकारच्या संदेशांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या गैरसमजुतींमध्ये भर पडली आहे. म्हणूनच ‘व्हॉट्सअ‍ॅप’मधील धोरणबदल म्हणजे नेमके काय होणार, हे समजून सांगण्याचा हा प्रयत्न…

पार्श्वभूमी
‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या धोरणबदलाची पहिली चर्चा जानेवारी महिन्यात सुरू झाली. व्हॉट्सअ‍ॅपने वापरकत्र्यांच्या गोपनीयता धोरणात (प्रायव्हसी पॉलिसी) ८ फेब्रुवारीपासून बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. हे बदल स्वीकार्ह न करणाºयांना ८ फेब्रुवारीनंतर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही, असेही जाहीर करण्यात आले. त्यावरून गहजब उडाला. असंख्य वापरकत्र्यांनी नाराजी व्यक्त करत व्हॉट्सअ‍ॅप हटवून टेलिग्राम, सिग्नल या अ‍ॅपकडे मोर्चा वळवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने तो निर्णय मागे घेतला. त्याऐवजी व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या धोरणांबाबत मोठ्या प्रमाणात जाहिराती आणि आवाहन करण्यास सुरुवात केली. त्यातूनच आता १५ मेपासून नवीन धोरण अमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन धोरणात काय?
‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या नवीन धोरणाचा मुख्य उद्देश या माध्यमातून चालवण्यात येणाºया व्यावसायिक ग्रुप आणि संदेशांबाबत स्पष्टता निर्माण करणे हा आहे. त्याचाच अर्थ हे धोरण स्वीकारणाºयांची निवडक माहिती व्हॉट्सअ‍ॅप व्यावसायिक हेतूने कंपन्यांना देऊ शकते. यामध्ये वापरकत्र्यांचा मोबाइल क्रमांक, मोबाइलचा आयपी अ‍ॅड्रेस, मोबाइलची माहिती अशी माहिती कंपन्यांना दिली जाईल. अर्थात व्हॉट्सअ‍ॅपवरून केल्या जाणाºया खासगी तसेच मित्रमंडळींतील संवादावर याचा परिणाम होणार नसल्याचा कंपनीचा दावा आहे. हे सर्व संवाद पूर्णपणे गोपनीय राहतील, असे कंपनीचे म्हणणे आहे.

फेसबुकशी देवाणघेवाण
जानेवारीमध्ये जाहीर झालेल्या धोरणात व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकत्र्यांची माहिती त्याची मालक कंपनी असलेल्या फेसबुकशी संलग्न अ‍ॅपना पुरवण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली होती. त्यावरूनही वापरकत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, ही माहिती केवळ फेसबुकशी संलग्न अ‍ॅपबाबत सुसूत्रता निर्माण करण्यासाठी ‘शेअर’ केली जाणार असून त्यातही वापरकत्र्यांची संपर्क यादी किंवा ठिकाण संलग्न केले जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अर्थात याव्यतिरिक्त बरीच माहिती व्हॉट्सअ‍ॅपने फेसबुककडे आधीच जमा केली आहे.
धोरण नामंजूर असल्यास…

व्हॉट्सअ‍ॅपचे हे धोरण स्वीकारण्यासाठी वापरकत्र्यांना १५ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, १५ मेनंतर नेमके काय करणार, हे कंपनीने सध्या स्पष्ट केलेले नाही. परंतु या धोरणविषयक कंपनीकडून जारी संभाव्य प्रश्नांच्या उत्तरांमध्ये धोरण न स्वीकारल्यास व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावर मर्यादा येतील, असे नमूद करण्यात आले आहे.