रशियाने ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडयात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी देणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, रशियाने आपला शब्द पाळला आहे. तिसऱ्या अंतिम फेजच्या मानवी चाचणीआधीच रशियाने सर्वसामान्य जनतेसाठी ही लस वापरायला मंजुरी दिली आहे. अधिकृत सरकारी मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे.
यापूर्वी चिनी लसीला मर्यादीत वापराची परवानगी देण्यात आली होती. चीन सरकारने फक्त पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनाच ही लस टोचण्याची परवानी दिली आहे. रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. फार कमी वेळात गामालिया इंस्टिट्यूटच्या लसीला परवानग्या मिळाल्या आहेत.

मानवी चाचणी सुरु केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत रशियाने सर्वसामान्य जनतेसाठी ही लस वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्प्यात असलेल्या अन्य कंपन्यांच्या लसी वर्षअखेरीस बाजारात येण्याची शक्यता आहे.

गामालिया इंस्टिट्यूटची स्वत:ची फॅसिलिटी सोडल्यास सिस्टिमाच्या मालकीच्या प्लानंटमध्ये रशियन लसीचे उत्पादन होऊ शकते. सिस्टिमा रशियातील मोठा व्यावसायिक समूह आहे. वर्षाला १५ लाख लसींचे उत्पादन करण्याची आमच्या प्रकल्पाची क्षमता असल्याचे सिस्टिमाने सांगितले. सिस्टिमाच्या म्हणण्यानुसार, उत्पादनाची क्षमता आणखी वाढवता सुद्धा येईल.

जगातील अन्य देशांकडून लसीच्या १ अब्ज डोससाठी मागणी आली आहे असे रशियाच्या वेल्थ फंडाच्या प्रमुखांनी सांगितल्याचे रॉयटर्सने म्हटले आहे. रशियाच्या लसीमध्ये कुठल्या देशांनी रस दाखवालय त्यांची नावे त्यांनी सांगितली नाहीत.

रशियन लस या मार्गाने भारतात उपलब्ध होऊ शकते. सेंट्रल ड्रग्स स्टँण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ही संस्था रशियाला भारतात फेज २ आणि ३ च्या चाचण्या करायला सांगू शकते. सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार परदेशात निर्मिती झालेल्या लसीला भारतात या चाचण्या कराव्या लागतात. फेज २ आणि ३ चे मानवी परीक्षण आवश्यक आहे. कारण लोकसंख्येच्या वेगवेगळया गटावर लसीची परिणामकारकता वेगवेगळी असू शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा सुद्धा याच मार्गाने प्रवास सुरु आहे. CDSCO ने अलीकडेच ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी घ्यायला परवानगी दिली. या आठवडयात ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी सुरु होऊ शकते. ‘स्पुटनिक व्ही’ असे या रशियन लसीचे नाव आहे. ही लस आता प्रथम वैद्यकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दिली जाईल.