$160 Million Gold Treasure Found After 50 Years Underground: ‘द ट्रॅव्हेलर कलेक्शन’ (The Traveller Collection) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या खजिन्यामध्ये ५० वर्षांहून अधिक काळ जमिनीत गाडलेली दुर्मीळ सोन्याची नाणी आढळून आली असून त्यांची सध्याची भारतीय रुपयांतील किमंत सुमारे दीड अब्ज रुपयांच्या घरात आहे. या खजिन्यामुळे दुर्मीळ नाण्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रात क्रांती होणार असल्याचं मानलं जातं. तज्ज्ञांनी या संपूर्ण संग्रहाला इतिहासातील सर्वात मौल्यवान न्युमिस्मॅटिक (नाणेसंग्रह) कलेक्शन असं संबोधलं आहे. या नाण्यांइतकंच त्यामागचं कथानकही तितकंच थक्क करणारं आहे.

युद्धाच्या गोंधळात गुप्तपणे दडवलेला खजिना

१९२९ साली वॉल स्ट्रीटचा शेअर बाजार कोसळल्यानंतर युरोपमधील एका संग्राहकाने आणि त्यांच्या पत्नीने दुर्मिळ आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची नाणी जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी युरोप आणि अमेरिका फिरून सुंदर, दुर्मीळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नाण्यांचा संग्रह सुरू केला. प्रत्येक नाण्याची नोंद करून त्यांनी एक खास आर्काइव्ह तयार केले. मात्र, दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागल्यानंतर आणि नाझी सैन्य युरोपभर फैलावत असताना, या संग्राहकाने एक निर्णायक पाऊल उचललं. त्यांनी नाणी सिगारेट बॉक्स आणि अ‍ॅल्युमिनियमच्या डब्यांमध्ये भरली आणि ती जमिनीत गाडून ठेवली. त्यानंतर ते इतिहासातून अदृश्य झाले. पुढील अनेक दशकं या खजिन्याचा पत्ता लागत नव्हता.

पुन्हा उजेडात आलेले ‘ट्रॅव्हेलर कलेक्शन’

५० वर्षांहून अधिक काळानंतर त्या संग्राहकांच्या वारसांनी हा खजिना पुन्हा शोधून काढला. त्यांनी नाणी एका बँकेच्या लॉकरमध्ये हलवली आणि आता ती जगासमोर मांडली जात आहेत. या कलेक्शनचा लिलाव नुमिस्माटिका आर्स क्लासिका (NAC) या लिलाव संस्थेमार्फत २० मे २०२५ पासून सुरू होणार असून, पुढील तीन वर्षांच्या कालावधीत त्याचा टप्प्याटप्प्याने लिलाव होईल. पहिल्या टप्प्यात चार्ल्स दुसरा ते जॉर्ज सहावा या इंग्लिश राजघराण्यांची यंत्राद्वारे तयार केलेली नाणी लिलावात मांडली जातील. एप्रिल महिन्यात ही नाणी NAC च्या लंडन कार्यालयात सार्वजनिक प्रदर्शनात असतील. NAC चे संचालक आर्टुरो रुसो यांच्या मते, “या संग्रहातील अनेक नाणी गेल्या ८० वर्षांत कुठेही पाहायला मिळाली नव्हती, तर काहींचा तर सरकारी नोंदीतही समावेश नाही.”

सोन्याची मौल्यवान आणि ऐतिहासिक नाणी

या संग्रहामधील विशेष नाण्यांपैकी एक म्हणजे १६२९ साली हॅब्सबर्गच्या फर्डिनँड तिसऱ्यासाठी तयार केलेलं १०० डुकॅटचं सोन्याचं नाणं. याचे वजन तब्बल ३४८.५ ग्रॅम असून, त्याची किंमत सुमारे १.३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. तसेच, १६२१ साली पोलंडच्या राजा सिगिस्मुंड तिसऱ्यासाठी तयार केलेलं ७० डुकॅटचं सोन्याचं नाणं सुद्धा महत्त्वाचं असून, त्याचे वजन २४३ ग्रॅम आहे आणि त्याची किंमत अंदाजे ४७१,७०० डॉलर्स आहे. या संग्रहात इराणच्या तेहरान आणि इस्फहानमध्ये अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात आग्हा मोहम्मद खान काजारच्या कारकिर्दीत तयार केलेली पाच टोमान्सची दुर्मिळ नाणी आहेत. असे केवळ पाच संपूर्ण सेट्स जगभरात अस्तित्वात आहेत. त्यातील एक ऑक्सफर्डच्या अ‍ॅश्मोलियन म्युझियममध्ये ठेवलेलं आहे.

संग्राहकाच्या दुर्मिळ नाण्यांची प्रेमगाथा

‘ट्रॅव्हलर कलेक्शन’ मध्ये १०० हून अधिक भौगोलिक क्षेत्रांतील नाणी आहेत. या संग्रहात प्राचीन संस्कृतींपासून ते आधुनिक काळापर्यंतच्या अनेक नाण्यांचा समावेश आहे. या नाण्यांची सुंदर जपणूक, दर्जा आणि इतिहासातील समृद्धी यामुळे हा संग्रह अद्वितीय ठरतो. NAC च्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, “अनेक नाणी ही सार्वजनिक लिलावात कधीच झळकलेली नाहीत,” आणि त्यामुळेच ही नाणी अत्यंत दुर्मीळ मानली जात आहेत. मूळ संग्राहकाने तयार केलेल्या तपशीलवार नोंदींमुळे संशोधकांना अनेक नाण्यांच्या उगम स्थळांपर्यंत पोहोचता आले. ‘डेविड गेस्ट नुमिस्मॅटिक्स’चे संचालक आणि कलेक्शनचे सल्लागार डेविड गेस्ट यांनी सांगितले की, “जेव्हा मी ट्रॅव्हेलर कलेक्शनमधील ब्रिटिश नाणी वर्गीकृत करत होतो, तेंव्हा मला हे सर्व स्वप्नवत वाटत होते.”

खरा इतिहास टिकतो

‘ट्रॅव्हलर कलेक्शन’ हा केवळ दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नाही, तर तो एका संग्राहकाच्या दृष्टिकोनाची, इतिहासप्रेमाची आणि संकटातही संस्कृती जपण्याच्या निश्चयाची साक्ष आहे. जमिनीखाली लपलेलं हे सोनं म्हणजे काळाच्या गर्भात गमावलेला इतिहास पुन्हा नव्यानं जगासमोर उभा राहिल्याचा क्षण आहे. हे संग्रह दाखवून देतात की, अगदी काळाच्या धुळीत गडप झाल्यावरही कलाकृती, खऱ्या आठवणी आणि खरा इतिहास कायमच टिकून राहतो.