Pakistan’s failed plan triggered 1965 India-Pakistan war: भारत- पाकिस्तान यांच्यामध्ये १९६५ साली झालेल्या युद्धाला यंदा ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९६५ साली ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेली ऑपरेशन जिब्राल्टर ही पाकिस्तानने राबवलेली सर्वात धाडसी पण त्याचवेळी सर्वाधिक अपयशी ठरलेली लष्करी मोहीम मानली जाते. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने शस्त्रसज्ज जवान स्थानिकांच्या वेशात जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले होते, जेणेकरून मोठ्या प्रमाणात भारतीय सत्तेविरुद्ध उठाव घडवून आणता येईल. मात्र, अपेक्षित उद्दिष्ट साध्य होण्याऐवजी हे ऑपरेशन पूर्णपणे फोल ठरलं. यामुळे थेट १९६५ चे भारत-पाकिस्तान युद्ध भडकले आणि उपखंडाच्या लष्करी तसेच राजकीय पटावर मोठे बदल घडून आले.

१. ऐतिहासिक पार्श्वभूमी

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि १९४८ साली संपलेल्या पहिल्या काश्मीर युद्धानंतर पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या स्थितीबद्दल कायम असमाधानी राहिला. हा भूभाग सतत वादाचा मुद्दा ठरला आणि पाकिस्तानने तो ताब्यात घेण्यासाठी कधी उघड, तर कधी गुप्त प्रयत्न केले. १९६० च्या सुरुवातीस पाकिस्तानच्या नेतृत्वाने असा तर्क लावला की, १९६२ च्या चीनविरुद्धच्या युद्धानंतर भारत कमकुवत झाला आहे. त्यांना विश्वास होता की, बाह्य मदत मिळाल्यास काश्मिरी मुस्लीम मोठ्या प्रमाणात बंड करतील. हाच चुकीचा अंदाज ऑपरेशन जिब्राल्टर या मोहिमेचा पाया ठरला. ही योजना पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती अय्यूब खान आणि पाकिस्तानी लष्कराच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. त्यांना खात्री होती की भारत यावर लष्करी प्रत्युत्तर देणार नाही.

This picture is of my maternal grandfather Brig. Hari Singh Deora A.V.S.M (Ati Vishisht Sewa Medal), 18th Cavalry (Indian Army). This picture was taken after Indian Army destroyed over 100 Patton and Sherman Tanks of Pakistani Army during the 1965 Indo-Pak War. The place was later named as Patton Nagar in Pakistan.
Hari Singh Deora A.V.S.M (Ati Vishisht Sewa Medal), 18th Cavalry (Indian Army)

२. योजनेची अंमलबजावणी

ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत हजारो पाकिस्तानी सैनिक आणि घुसखोरांना नियंत्रण रेषा (त्यावेळी ‘सिझफायर लाईन’ म्हणून ओळखली जात असे) ओलांडून काश्मीरमध्ये पाठवण्यात आलं. हे लोक स्थानिक बंडखोरांच्या वेशात आले होते. त्यांचे उद्दिष्ट भारतीय प्रशासन विस्कळीत करणे, पायाभूत सुविधा उध्वस्त करणे आणि काश्मीरमध्ये भारताविरुद्ध सशस्त्र बंड भडकवणे हे होते. या घुसखोरांना सलाहुद्दीन, गजनवी यांसारख्या ऐतिहासिक इस्लामी आक्रमकांच्या नावाने वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आलं होतं. त्यांच्याकडे शस्त्रं, स्फोटके आणि प्रचार साहित्य होतं. त्यांना अपेक्षा होती की, काश्मिरी जनता मोठ्या प्रमाणात त्यांना साथ देईल.

A Pakistani M48A1 Patton tank
Pakistani AMX-13 (1965 War)A Pakistani M48A1 Patton tank

३. अपयशाची कारणं

  • स्थानिक पाठिंब्याचा अभाव: पाकिस्तानच्या गृहितकाच्या विपरीत, काश्मिरी मुस्लीम मोठ्या प्रमाणात बंडासाठी उठले नाहीत. उलट अनेक स्थानिकांनी घुसखोरांची माहिती भारतीय अधिकाऱ्यांना दिली.
  • भारतीय लष्करी प्रत्युत्तर: भारताने ही घुसखोरी लगेच ओळखली आणि पाकिस्तानी सैन्याला बाहेर काढण्यासाठी प्रतिहल्ला सुरू केला.
  • निकृष्ट नियोजन: पाकिस्तानने भारताची क्षमता आणि प्रत्युत्तर देण्याची तयारी कमी लेखली.
  • गुप्तचर यंत्रणांची चूक: पाकिस्तानने काश्मीरमधील राजकीय वातावरणाचा चुकीचा अंदाज लावला आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची आपली ताकद अधिक आहे, या गैरसमजात ते राहिले.
  • या सर्व अपयशांमुळे ऑपरेशन उघडकीस आलं. त्याचबरोबर पाकिस्तान लष्करीदृष्ट्या असुरक्षित आणि राजनैतिकदृष्ट्या एकाकी पडला.
  • फ्रेंड्स नॉट मास्टर्स (१९६७) या आत्मचरित्रात अयुब खान वारंवार भारतीयांचा उल्लेख ‘हिंदू’ असा करताना त्यांना धूर्त, अविश्वासू आणि भित्रे अशी विशेषणं लावतो व त्यांची तुलना तो मुस्लिमांच्या शौर्याशी करतो. त्याचाच परिणाम १९६५ च्या युद्धातील झालेला दिसतो. हिंदू हीन आहेत या विश्वासामुळे त्याने भारताच्या प्रतिकारक्षमतेला कमी लेखलं. त्याला वाटलं की, लालबहादूर शास्त्री हे सौम्य स्वभावाचे आणि शारीरिकदृष्ट्या प्रभावहीन असल्यामुळे ते ठोस प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत; परंतु हा अंदाज चुकीचा ठरला आणि भारताने पंजाब व काश्मीरमध्ये प्रतिआक्रमण करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं.

4. ऑपरेशन जिब्राल्टरने १९६५ चे युद्ध कसे भडकवले?

काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना ओळखल्यावर परिस्थिती झपाट्याने गंभीर झाली. भारताने कठोर लष्करी कारवाई करत प्रतिहल्ला केला आणि पाकिस्तानी तळांना लक्ष्य करण्यासाठी नियंत्रण रेषा ओलांडली. ही कारवाई लवकरच पश्चिम मोर्च्यावर पूर्ण प्रमाणात युद्धात परिवर्तित झाली. ६ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर १९६५ या कालावधीत पंजाब, काश्मीर आणि राजस्थानमध्ये लढाया झाल्या. या युद्धात दोन्ही देशांना प्रचंड जीवितहानी आणि लष्करी नुकसान सहन करावं लागलं. शेवटी, संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २३ सप्टेंबर १९६५ रोजी युद्धबंदी झाली आणि संघर्षाची सांगता झाली.

Indian Centurion tank
Indian Centurion tank

6. १९६५ च्या युद्धाचा निकाल

पाकिस्तानने काश्मीर भारताकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र युद्ध शेवटी कोणाच्याही बाजूने न झुकता युद्धबंदीवर संपले. ही युद्धबंदी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने घडवून आणली. भारताने आपले भूभाग यशस्वीपणे वाचवले, तर पाकिस्तान आपली उद्दिष्ट साध्य करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. जानेवारी १९६६ मध्ये सोव्हिएत संघाच्या मध्यस्थीने झालेल्या ताश्कंद करारानं सीमांची युद्धपूर्वस्थिती पुनर्स्थापित केली, मात्र काश्मीरचा मूळ वाद अनिर्णित राहिला. या युद्धाचे दीर्घकालीन परिणाम झाले. पाकिस्तानची लष्कराची प्रतिमा मोठ्या प्रमाणात मलिन झाली, तर भारताची काश्मीरमधील स्थिती अधिक मजबूत झाली. यामुळे दोन्ही देशांमधील भविष्यातील संघर्षांची बीजंही रोवली गेली.

7. ऑपरेशन सिंदूरनंतरचं भारत-पाकिस्तान नातं

  • जवळपास सहा दशकांनंतरही ऑपरेशन जिब्राल्टरची छाया भारत-पाकिस्तान संबंधांवर घोंगावत आहे. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा बळी गेल्यानंतर पुन्हा एकदा तणाव वाढला.
  • यावर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. नवी दिल्ली सातत्याने स्पष्ट करत आली आहे की, सीमापार दहशतवाद संपल्याशिवाय पाकिस्तानसोबत संवाद पुन्हा सुरू होऊ शकत नाही.
  • या शत्रुत्वाच्या चक्राची पुनरावृत्ती इतिहासाशी मिळतीजुळती आहे. पाकिस्तानकडून घुसखोरी आणि त्यावर भारताचे निर्णायक लष्करी प्रत्युत्तर. मात्र आजची परिस्थिती १९६५ पेक्षा वेगळी आहे. भारताचे आंतरराष्ट्रीय समर्थन खूपच जास्त आहे आणि त्याची भू-राजकीय स्थितीही अधिक सक्षम झाली आहे.