60 Years of the Indo-Pak 1965 War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक संघर्ष झाले आहेत आणि काश्मीर हा नेहमीच या वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यापैकी सर्वात महत्त्वपूर्ण संघर्ष म्हणजे १९६५ चे युद्ध, या युद्धात भारताने लष्करी सामर्थ्यावर पाकिस्तानला पराभूत केले. हा संघर्ष ६ सप्टेंबर पासून २३ सप्टेंबरपर्यंत म्हणजे १७ दिवस चालला. या युद्ध समाप्तीला आता ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ऑपरेशन जिब्राल्टर’मुळे या युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी करून उठाव भडकावण्याचा प्रयत्न केला. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून व्यापक लष्करी प्रतिहल्ला केला. मात्र, हा संघर्ष अल्पकाळ टिकला आणि अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धबंदी झाली!
पाकिस्तानच्या अविचारी कारवाईला भारताचे प्रत्युत्तर
हे युद्ध भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिलं सर्वसमावेशक (full-scale) युद्ध होतं. या संघर्षात दोन्ही देशांनी त्यांच्या हवाई दलांचा वापर केला. पाकिस्तानी हवाई दल (PAF) प्रामुख्याने अमेरिकेत तयार झालेल्या अत्याधुनिक विमानांनी सुसज्ज होते, तर भारतीय हवाई दलात (IAF) ब्रिटिश व सोव्हिएत बनावटीच्या विमानांचा मिश्र ताफा होता. भारतीय ग्नॅट हे जेट लहान असलं तरी प्रभावी ठरलं. त्याने पाकिस्तानच्या साबरे लढाऊ विमानांना मोठं नुकसान पोहोचवलं आणि त्यामुळे त्याला ‘साबरे स्लेअर’ (Sabre Slayer) हे टोपणनाव मिळालं. या संघर्षादरम्यान भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानची (PAF) एकूण ७३ लढाऊ विमाने पाडली.
पाकिस्तानने भारतातील काही महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला करण्यासाठी गुप्त मोहिमा आखल्या होत्या, त्यात हलवारा, पठाणकोट आणि आदमपूरवर हवाई तळांचा समावेश होता. यासाठी त्यांनी एसएसजी कमांडोंना (Special Services Group) पॅराशूटद्वारे उतरवले. परंतु, या कारवाया पूर्णपणे अपयशी ठरल्या. बहुतांश कमांडोंना भारतीय सुरक्षा दलांनी आणि स्थानिक नागरिकांनी कंठस्थान घातले.

भारताने काबीज केलेल्या पाकिस्तानच्या महत्त्वाच्या भूभागांचा ताबा
या युद्धकाळात भारताने साधारण १,८४० ते १,९२० चौ. किमी पाकिस्तानी भूभाग काबीज केला. यात सियालकोट आणि लाहोर परिसरातील सुपीक प्रदेश तसेच काश्मीरमधील काही भागांचा समावेश होता. युद्धात महत्त्वाच्या रणनीतिक स्थळांपैकी एक असलेला हाजी पीर दर्रा देखील भारताच्या ताब्यात आला.
ताश्कंद करार
१९६६ साली जानेवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री आणि पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष अय्यूब खान यांनी ताश्कंद करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या कराराचा उद्देश युद्धापूर्वीची स्थिती पूर्ववत करणे हा होता. संयुक्त राष्ट्रांच्या युद्धबंदीनंतर भारताकडे काही भूभाग तात्पुरता ताब्यात असला तरी, या करारानुसार तो कायमस्वरूपी भारतात विलीन करण्यात आला नाही.
ताश्कंद करारातील प्रमुख मुद्दे
- युद्धबंदी आणि सैन्य माघार: दोन्ही बाजूंनी ५ ऑगस्ट १९६५ पूर्वीच्या सीमारेषेवर परत जाण्यास मान्यता दिली. युद्धादरम्यान काबीज केलेले भूभाग परत करायचे आणि युद्धपूर्व स्थिती (status quo ante) पुनर्स्थापित करायची असं ठरलं.
- राजनैतिक संबंधांची पुनर्स्थापना: दोन्ही देशांनी सामान्य राजनैतिक आणि आर्थिक संबंध पुन्हा सुरू करण्यास सहमती दिली. उच्चायुक्तांनी पुन्हा आपल्या कार्यभारावर रुजू व्हायचं ठरलं.
- अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याची हमी: एकमेकांच्या अंतर्गत बाबींमध्ये कोणताही हस्तक्षेप न करण्याचे वचन दोन्ही देशांनी दिलं.
- शांततापूर्ण मार्गाने तोडगा: भविष्यातील वादविवाद सामंजस्याने आणि संवादातून, बलप्रयोग न करता, सोडवायचे ठरले.

१९७१ च्या युद्धाची पायाभरणी
- १९६५ च्या युद्धानंतर पाकिस्तानात अंतर्गत असंतोष प्रचंड वाढला, विशेषतः पूर्व पाकिस्तानात (आताचा बांगलादेश) याचे पडसाद उमटले. तिथल्या लोकांना सतत दुर्लक्षित केले जात आहे आणि अतिरिक्त ओझं टाकलं जात आहे, अशी भावना निर्माण झाली होती.
- पश्चिम पाकिस्तानातील लष्करी उच्चवर्गाने काश्मीरच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं, पण पूर्व पाकिस्तानातील आर्थिक-सामाजिक समस्या दुर्लक्षित केल्या. या दुर्लक्षामुळे आणि १९६५ च्या लष्करी अपयशामुळे प्रचंड नाराजी निर्माण झाली.
- याच असंतोषाने पुढे १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाला खतपाणी घातले गेले. त्यामुळे १९६५ चे युद्ध अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या अखेरीस झालेल्या विभाजनाला जबाबदार ठरले.