हल्लीच विक्रम संपत यांचे ‘द टिपू सुलतान’ (Tipu Sultan: The Saga of Mysore’s Interregnum (1760–1799) हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यानंतर टिपू सुलतान आणि भारतीय राजकारण हा मुद्दा चर्चेत आला. त्यांनी बरखा दत्त यांना ‘मोजो’ या चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत भारतीय इतिहासातील टिपू सुलतानाविषयी असलेले समज आणि गैरसमज यावर भाष्य केले, तसेच हाच त्यांच्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. मूलतः त्यांनी दिलेल्या मुलाखतीत टिपू सुलतानाची हिंदूप्रेमी असणारी प्रतिमा कशी दिशाभूल करणारी आहे हे स्पष्ट केले आहे. हेच सांगताना त्यांनी टिपूने केलेल्या एका हत्याकांडाचा उल्लेख केला. या हत्याकांडामुळे कर्नाटकमधील मंड्यम अय्यंगार हा समाज दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी दिवशी दिवाळी साजरी करत नाही. त्याच पार्श्वभूमीवर या हत्याकांडाचा इतिहास नेमकं काय सांगतो याचा घेतलेला हा आढावा.

‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस

दिवाळी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय. प्रकाशाची अंधारावर मात म्हणूनच दिवाळीच्या दिवसात दिव्यांची आरास करून सभोवताल प्रकाशमय केला जातो. परंतु कर्नाटकातील मंड्यम अय्यंगार या समुदायासाठी दिवाळी हा सण रक्तपात, अत्याचार यांची आठवण करून देणारा सण आहे. कर्नाटकातील मंड्यम अय्यंगार समुदाय ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस म्हणून पाळतात. दोन शतकांपूर्वी या दिवशी, ‘मैसूरचा वाघ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानाने मेलकोट येथे सुमारे ८०० मंड्यम अय्यंगार पुरुष, महिला आणि मुलांचे निर्दयपणे शिरकाण केले होते. हत्याकांडाचे अचूक वर्ष ज्ञात नसले तरी या समुदायाचे सदस्य हे हत्याकांड १७८३-१७९५ च्या दरम्यान घडल्याचे सांगतात.

अधिक वाचा: Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?

श्री रामानुजाचार्य यांचे अनुयायी

मेलकोट हे कर्नाटकाच्या मांड्या जिल्ह्यातील एक छोटं डोंगरी गाव आहे. तिरुनारायणपुरम म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण चेलुवनारायण आणि योग नरसिंह या दोन प्रसिद्ध मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. मंड्यम अय्यंगार हे अय्यंगार समुदायाचा भाग आहेत. श्री रामानुजाचार्य यांचे अनुयायी असलेला हा समुदाय १२ व्या शतकात मेलकोट येथे स्थायिक झाला. त्यावेळी होयसळ राजा विष्णुवर्धन याने त्यांना आश्रय दिला होता. होयसळ साम्राज्याच्या पतनानंतरही विजयनगर साम्राज्याच्या काळात मंड्यम अय्यंगार समुदायाची स्थिती चांगली होती. विजयनगरच्या राजांनी चेलुवनारायण मंदिराला मोठे अनुदान दिले आणि मेलकोटच्या अय्यंगारांना संरक्षण दिले.

वोडेयारांची उदारता

१५६५ पर्यंत विजयनगर साम्राज्य जवळजवळ विस्कळीत झाले. त्यामुळे मैसूरच्या वोडेयार घराण्याने स्वातंत्र्य घोषित केले. राजा वोडेयार पहिला याच्या नेतृत्वाखाली मैसूर राज्याने आपला प्रभाव विस्तारला. या राज्याच्या संरक्षणाखाली असलेल्या मंड्यम अय्यंगार समुदायाची पुढील १५० वर्षांत प्रगती झाली आणि त्यांनी वोडेयारांच्या अंतर्गत महत्त्वपूर्ण प्रशासकीय व धार्मिक पदे भूषवली. चेलुवनारायण मंदिर देखील मंड्यम अय्यंगारांच्या देखरेखीखाली सोपवले गेले. वोडेयारांच्या उदारतेमुळे या समुदायाने भरभराट आणि प्रतिष्ठा मिळवली होती.

अधिक वाचा: Queen Elizabeth wedding cake: ८० वर्षे जुन्या केकची किंमत तब्बल २ लाख रुपये; काय आहे नेमकं प्रकरण? राणी एलिझाबेथचा काय संबंध?

हैदर अली याचे वर्चस्व

परंतु, १७६० पर्यंत वोडेयार घराण्याने आपल्या अधिकाराचा बहुतांश भाग दलवाई (सेनाप्रमुख) यांना सुपूर्द केला होता. सिंहासनावर वोडेयार होते, परंतु त्यांचे अस्तित्व केवळ सांकेतिक होते. १७६३ मध्ये कृष्णराजा वोडेयार द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्या सेनापतींमध्ये सर्वात प्रभावी असलेला हैदर अली याने मैसूरच्या राजसत्तेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मंड्यम अय्यंगारांनी वोडेयार घराण्याप्रती तीव्र निष्ठेचे प्रदर्शन करून त्याचे ऋण फेडले. वृद्ध राणी लक्ष्मम्मणीने वोडेयार राजवंशातील राजाला पुन्हा सिंहासनावर बसवण्याचे प्रयत्न केले आणि या प्रयत्नांत मंड्यम अय्यंगारांनी मोठा हातभार लावला. या प्रयत्नांमध्ये प्रमुख भूमिका निभावली ती मैसूरचे प्रधान थिरुमलै अय्यंगार आणि त्यांचे बंधू नारायण अय्यंगार यांनी. हैदर अलीला सत्तेवरून हटवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीसोबत युती करण्याच्या दिशेने चर्चा सुरू करण्यात आली. परंतु, हा कट हैदर अलीला कळला आणि त्याने दोन्ही भावांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कैद केले. छळाच्या भीतीने या समुदायातील अनेकजण मद्रास प्रेसिडेंसीत स्थलांतरित झाले. आश्चर्य म्हणजे, हैदर अलीने काही महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर असलेल्या इतर मंड्यम अय्यंगारांना त्यांच्या पदांवरच ठेवले.

मंड्यम अय्यंगार समुदायाचा संहार

१७८३ साली हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान गादीवर आला. अय्यंगार समुदाय आणि वृद्ध राणी यांच्यातील संबंधाबद्दल टिपू अत्यंत सावध होता. हैदर अलीच्या मृत्यूनंतर, राणी लक्ष्मम्मणीने इंग्रजांसोबत लष्करी युती करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले. टिपूच्या दरबारातील मंत्री शमैय्या अय्यंगार यांनी गुप्तपणे मद्रास सैन्यातील उच्चाधिकारी मेजर जनरल लॉर्ड जॉर्ज हॅरिस यांच्याशी संपर्क साधला. या पत्रव्यवहाराकडे टिपू सुलतानाने विश्वासघात म्हणून पाहिले आणि त्याने मेलकोटमधील संपूर्ण मंड्यम अय्यंगार समुदायाचा संहार करण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा: Indian culture Cambodia: ९०० वर्षे जुनी द्वारपालांची शिल्पं सापडली; कंबोडियात उलगडला भारतीय शिल्पकलेचा वारसा!

नरक चतुर्दशीच्या दिवशी…

‘नरक चतुर्दशी’च्या दिवशी दक्षिण भारतातील अनेक समुदाय दीपावली साजरी करत असताना टिपू सुलतानाच्या सैन्याने मेलकोटमधील मंड्यम अय्यंगार समुदायाला वेढले. ८०० हून अधिक लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि मेलकोट उद्ध्वस्त झाले. उर्वरित रहिवाशांनी गाव सोडले आणि मेलकोट एक रात्रीत निर्मनुष्य झाले. पुढे लॉर्ड जॉर्ज हॅरिस याची मद्रास सैन्याचा सेनापती म्हणून नियुक्ती झाली, त्याने चौथ्या इंग्रज-मैसूर युद्धात इतर दोन ब्रिटिश सैन्यांबरोबर भाग घेतला आणि टिपू सुलतानाचा पराभव केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शोकदिवस

आजपर्यंत, मंड्यम अय्यंगार समुदाय नरक चतुर्दशी साजरी करत नाही आणि टिपू सुलतानाच्या कृत्यांमुळे हा दिवस शोकदिवस म्हणून पाळतात. या हत्याकांडाच्या स्मृती त्यांच्या सामूहिक चेतनेत खोलवर कोरल्या गेल्या आहेत. २०१४ साली, या हत्याकांडावर आधारित एक शोध निबंध डॉ. एम.ए. जयश्री आणि प्रा. एम.ए. नरसिंहन यांनी सादर केला होता.