उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडांना आज(शनिवार) काहीसा विराम मिळाला. कारण, आज भाजपाने पुष्कर सिंह धामी यांची उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर, नवे मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर तीन-चार नावं देखील चर्चेत होते. मात्र, भाजपा नेतृत्व व आमदारांनी पुष्कर सिंह धामी यांची मुख्यमंत्रपदासाठी निवड करत, उत्तराखंडला त्यांच्या रुपात एक तरूण नेतृत्व दिलं आहे. पुष्कर सिंह धामी नेमके कोण आहेत? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जाणारे पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे २००२ पासून २००८ अध्यक्ष देखील होते. त्यांचे वडील माजी सैनिक असून, त्यांना तीन बहिणी आहेत. पुष्कर धामी यांचे जन्मगाव टुण्डी, पिथौरागड येथे झाला होता. मानव संसाधन व्यवस्थापन आणि औद्योगिक विषयात पीजी व एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री ; उद्या शपथविधी!

पुष्कर सिंह धामीने उत्तराखंडमधील खटीमा मतदारसंघातून दोनदा विजय मिळवलेला आहे. २०१२ ते २०१७ ते आमदार राहिले. त्यानंतर २०१७ मध्ये उत्तराखंडमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ते विजयी झाले. याशिवाय, १९९० पासून १९९९ पर्यंत जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत अभाविप मध्ये विविध पदांवरही त्यांनी काम केलेलं आहे. धामी यांचे म्हणणे आहे की सहा वर्ष प्रदेशाध्यक्ष राहून त्यांनी जागो-जागी फिरून युवा बेरोजगारांना संघटित करण्याचं काम केलं.

२००१-२००२ मध्ये भगतसिंह कोश्यारी हे मुख्यमंत्री असताना पुष्कर धामी यांनी त्यांच्याकडे ओएसडी म्हणूनही काम पाहिले होते. तसेच, राज्यातील नागरी देखरेख समितीचे उपाध्यक्ष(राज्यमंत्री पदासह) या पदावरही त्यांनी काम केलेले आहे.

जेव्हा पासून उत्तराखंडला नवा मुख्यमंत्री मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्या, तेव्हापासूनच अनेक नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे होती. यामध्ये सतपाल महाराज, त्रिवेंद्र सिंह रावत, धन सिंह रावत आदींसह अनेकांचा समावेश होता. अखेर पुष्कर धामी यांनीच या शर्यतीत बाजी मारली.