India active volcano erupt भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमान आणि निकोबार बेटांवर स्थित असलेल्या बॅरन बेटावर आहे. न्यूज एजन्सी ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, या ज्वालामुखीमध्ये (Barren Island volcano) अवघ्या आठ दिवसांत दोन उद्रेक झाले असल्याची माहिती आहे. १८ सप्टेंबर रोजी अंदमान समुद्रात झालेल्या ४.२ रिश्तर स्केलच्या भूकंपानंतर दोन दिवसांनी ज्वालामुखीत स्फोट झाला. भारतीय नौदलानेही या उद्रेकाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असल्याने या ज्वालामुखीची चर्चा सुरू झाली आहे. हा ज्वालामुखी नक्की कुठे आहे? या बेटाचे महत्त्व काय? यापूर्वी या भागात ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडल्या आहेत का? त्याविषयी जाणून घेऊयात…
हा ज्वालामुखी नक्की आहे कुठे?
पोर्ट ब्लेअरच्या सुमारे १४० किलोमीटर ईशान्येस असलेले बॅरन बेट हे भारतातील, तसेच संपूर्ण दक्षिण आशियाई प्रदेशातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी असलेले ठिकाण आहे. हे बेट भारतीय आणि बर्मीज टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर वसलेले आहे, त्यामुळे भूकंपाचे आणि ज्वालामुखीचे कार्य (Seismic and volcanic activity) अभ्यासणाऱ्या भूगर्भशास्त्रज्ञांसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण ठरते.
नुकताच झालेला उद्रेक कॅमेऱ्यात कैद
नुकत्याच झालेल्या ज्वालामुखी उद्रेकांपैकी एकाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर)वर संवाद टीव्हीने शेअर केला होता. भारतीय नौदलाच्या एका युद्धनौकेने (Indian Navy warship) टिपलेल्या या क्लिपमध्ये ज्वालामुखीच्या मुखातून (Crater) धगधगता लाव्हा बाहेर पडताना आणि आकाशात धुराचे दाट लोट उसळताना दिसत आहेत.
बॅरन बेटावरील ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना
नोंदीनुसार बॅरन बेटाचा पहिला उद्रेक १७८७ मध्ये झाला होता. तेव्हापासून या ज्वालामुखीने अधूनमधून क्रियाशीलता दाखवली आहे. या ज्वालामुखीत १९९१, २००५, २०१७ व २०२२ मध्ये उद्रेक झाले होते. त्यानंतर थेट २०२५ मध्ये या ज्वालामुखीत उद्रेक सुरू झाले आहेत. १९९१ मधील उद्रेक बेटावर राहणाऱ्या प्राणी प्रजातींसाठी हानिकारक होता. या बेटावर फारसे वन्यजीव नसले तरी शेळ्या, उंदीर व कबूतर यांसारख्या काही प्रजाती आढळून येतात. बंगालच्या उपसागरात झालेल्या एका जहाज अपघातामुळे या बेटावर शेळ्या आल्या असाव्यात आणि त्या ज्वालामुखीच्या उतारावर असलेल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यांमुळे तग धरून राहिल्या असाव्यात, असे काही दावे आहेत.

बॅरन बेटाला निर्जन बेट का म्हणतात?
बॅरन बेट निर्जन असूनही ते दक्षिण आशियातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी बेट असल्यामुळे जगभरातील लोकांमध्ये कुतूहल निर्माण करते. या बेटावरील भूप्रदेश उर्वरित अंदमान बेटांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या प्रदेशातील बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर पांढरी वाळू आढळते; मात्र बॅरन बेटाचे किनारे ज्वालामुखीच्या राखेने (Volcanic ash) झाकलेले आहेत. या बेटावर मानवी वस्ती शक्य नाही आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव येथे प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. परंतु, पर्यटक बोटीने किंवा जहाजातून या बेटाच्या आजूबाजूचा परिसर पाहू शकतात.
या बेटाच्या आसपासचे पाणी अतिशय स्वच्छ असून, ते सागरी जीवांनी समृद्ध आहे. त्यामुळे हे ठिकाण स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगच्या शौकिनांसाठी एक लोकप्रिय स्थान आहे. इथे मानवी वस्ती नसली तरी हे बेट काही प्रकारच्या वन्यजीवांना आधार देते. अंदमान बेटाच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटनुसार, रानटी शेळ्या, वटवाघळे, उंदीर आणि काही प्रकारचे पक्षी यांसारख्या प्रजातींनी येथील ज्वालामुखीच्या वातावरणाशी जुळवून घेतले आहे.
बॅरन बेट महत्त्वाचे का?
बॅरन बेट हा केवळ एक नैसर्गिक चमत्कार नसून, एक महत्त्वाचे भूगर्भीय स्थळ (Geological landmark)देखील आहे. या ज्वालामुखीतील उद्रेक हिंदी महासागर प्रदेशातील गतिशील टेक्टोनिक प्रक्रियांची माहिती देतात. वैज्ञानिक या बेटावर सतत लक्ष ठेवून असतात, जेणेकरून त्यांना ज्वालामुखीचे नमुने, भूकंपाचे कार्य आणि आसपासच्या प्रदेशांना असलेले संभाव्य धोके अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील.
भारतातील ज्वालामुखी
भारतात काही निष्क्रिय (Extinct) आणि सुप्त/निद्रिस्त (Dormant) ज्वालामुखी आहेत. ते खालीलप्रमाणे :
- नारकोंडम बेट (Narcondam Island) – (सुप्त)
- दख्खनचे पठार (Deccan Plateau) – (निष्क्रिय)
- बारातांग बेट (Baratang Island) – (चिखलाचे ज्वालामुखी; सक्रिय)
- ढिनोधर हिल्स (Dhinodhar Hills) – (निष्क्रिय)
- ढोसी हिल (Dhosi Hill) – (निष्क्रिय)
- तोषम हिल (Tosham Hills) – (निष्क्रिय)
- लोकटक सरोवर (Loktak Lake) – (महाज्वालामुखीचे विवर)
सर्वांत मोठा सक्रिय ज्वालामुखी कोणता?
स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटच्या नॅचरल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या ग्लोबल व्होल्कॅनिकनुसार, ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत जगातील सुमारे ४६ ज्वालामुखींमध्ये सतत उद्रेक होण्याची स्थिती होती. हवाईतील मौना लाओ हा जगातील सर्वांत मोठा सक्रिय ज्वालामुखी मानला जातो. भूकवचाला पडलेल्या भेगेतून किंवा गोलाकार छिद्रातून भूपृष्ठावर येणाऱ्या लाव्हारसाच्या प्रक्रियेला ज्वालामुखी, असे म्हणतात आणि ज्या अरुंद भेगेतून किंवा छिद्रातून हा लाव्हारस भूपृष्ठावर येतो, त्याला ज्वालामुखीचे मुख, असे म्हणतात.