तमिळनाडूतील प्रख्यात अभिनेते थलपती विजय यांच्या करूर येथील सभेत चेंगराचेंगरी होऊन ३९ जणांना जीव गमवावा लागला. सभेला तीस हजारांची गर्दी अपेक्षित असताना प्रत्यक्षात दुप्पट नागरिक सभास्थळी होते. विजय यांचा तमिळगा वेट्री कळघम (टीव्हीके) पक्षाच्या राजकीय पटलावरील कामगिरीबाबत उत्सुकता आहे. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. त्याचे मतात रूपांतर होऊन तमिळनाडूत सत्तांतर होईल का, हा प्रश्न असून, राज्याच्या राजकारणातील तिसऱ्या पर्यायाची जोरदार चर्चा सुरू आहे.

द्रमुकविरोधी मतांवर भिस्त

तमिळनाडू मे महिन्यात विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. सध्या द्रमुक आघाडी सत्तेत आहे. त्यांना पारंपरिक प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुकचे आव्हान दिसते. काँग्रेसचे मिंजुर भक्तवत्सलम हे १९६७ मध्ये मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. त्यानंतर गेली ५८ वर्षे द्रमुक-अण्णा द्रमुक यांच्याभोवती राज्यातील सत्ता फिरते. अभिनेते एम.जी.रामचंद्रन, जयललिता, करुणानिधी या चित्रपटसृष्टीशी संबंधितांचेच राज्याच्या राजकारणावर प्रभुत्व राहिले. विजराज अल्गरस्वामी ऊर्फ विजयकांत यांनीही देसिया मोरपोक्कू द्रविड कळघम हा पक्ष २००५ मध्ये स्थापन करून तमिळनाडूच्या राजकारणात द्रमुक-अण्णा द्रमुकला पर्याय देण्याचा प्रयत्न केला. आता जोसेफ विजय चंद्रशेखर ऊर्फ विजय या ५१ वर्षीय अभिनेत्याने द्रमुकच्या सत्तेला आव्हान दिलंय. गेली तीन दशके सत्तरच्या आसपास चित्रपटांतून त्यांनी कामे केली असून, लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते अशी त्यांची ओळख. राजकारणात द्रमुकच्या विरोधात अण्णा द्रमुकमध्ये जयललितांच्या पश्चात नेतृत्वावरून सुंदोपसुंदी असल्याने विरोधी राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. यातून विरोधी पक्षांच्या जागा व्यापण्याची संधी अनायसे विजय यांना चालून आली असून, त्यांच्या सभांना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता राज्यात यंदा विधानसभेला ते काही चमत्कार घटविणार काय, याची चर्चा सुरू आहे. विजय यांनीच प्रशासन आमच्या सभांसाठी छोट्याच जागांना परवानगी देते अशी तक्रार केली. यावरून त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाची कल्पना येते. हा मुद्दा करुर येथील चेंगराचेंगरी पाहता महत्त्वाचा ठरतो.

फॅन क्लब ते राजकीय पक्ष

बहुतेक वेळा अभिनेत्यांना पाहण्यास प्रचंड गर्दी होते. दक्षिणेत तर अभिनेत्यांचे भलतेच प्रस्थ. अशा वेळी विजय जेथे जातील तेथे सभांना अफाट जनसमुदाय त्यांची वाट पहात असल्याचे दृश्य. आता ही गर्दी त्यांना सत्तेत बसवते काय? तमिळनाडूत विधानसभेच्या २३४ जागा आहेत. हा आकडा अशासाठी महत्त्वाचा की त्यावरून राज्याच्या आकाराचा अंदाज येतो. सध्या सत्तारूढ द्रमुक आघाडीकडे १५९ आमदार. यात द्रमुकसह काँग्रेस, डावे पक्ष व इतर काही छोटे पक्ष आहेत. तर विरोधात राष्ट्रीय लोकशाही आघाडी यात अण्णा द्रमुककडे नेतृत्व आहे. त्यात अण्णा द्रमुकचे ६१, भाजपचे चार व पीएमकेच्या दोन्ही गटांचे मिळून ५ तर चार अपक्ष असे आमदारांचे संख्याबळ आहे. थोडक्यात विजय यांना शून्यातून सुरुवात करायची आहे. सत्ताधारी द्रमुक तसेच भाजप या पक्षांवर टीका करत ते वाटचाल करत असल्याने या दोघांबरोबर जाण्याची शक्यता जवळपास नाही. जागतिक स्तरावर सरकार चित्रपट (२०१८) असो किंवा वरिशू (२०२३) त्यांनी तीन-चारशे कोटींचा व्यवसाय केला. यातूनच त्यांची अफाट लोकप्रियता दिसते. २००९ मध्ये विजय मक्कल इयक्कम या आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण केले. आता सोळा वर्षांनी टीव्हीके हा त्यांचा राजकीय पक्ष सत्तेसाठी प्रबळ दावेदार मानला जातो.

राजकारणासाठी अभिनयाला रामराम

अण्णा द्रमुकला २०११ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पाठिंबा दिला. चार वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फॅनक्लबच्या सदस्यांनी भाग घेत उत्तम यश मिळवले. पुढे २०२३-२४ मध्ये त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. त्यातून २ फेब्रुवारी २०२४ रोजी तमिळगा वेट्री कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. जननायगन ऊर्फ थलपती ६९ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. २०२६ मध्ये पोंगल दरम्यान तो पडद्यावर येईल. राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनय सोडत असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या सीएए कायद्यावर टीकास्त्र सोडत आपली भूमिका विजय यांनी स्पष्ट केली. यातून भाजपशी त्यांचे सख्य होणे कठीण आहे. विजय हे प्रामुख्याने सत्ताविरोधी नाराजीतून मते घेतील त्यामुळे अण्णा द्रमुकला फटका बसेल. पर्यायाने द्रमुक विरोधातील मतांची विभागणी होईल असा तर्क आहे. सत्ताधारी द्रमुक आघाडीने सामाजिक समीकरण भक्कम ठेवले. दलित व मुस्लीम मतांच्या दृष्टीने छोटे पक्ष आघाडीत सहभागी करून घेतले आहेत. त्यामुळे विजय यांना यश मिळवणे तितके सोपे नाही. द्रमुकची किती मते घेतात त्यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल. त्यांच्या सभांना येणाऱ्यात बरेच जण अभिनेते म्हणून पाहण्यास येतात. प्रत्यक्षात त्याचे मतांत परिवर्तन करायचे असल्यास गावपातळीपर्यंत संघटना गरजेची ठरते. फॅनक्लबमधील सदस्य असे तळागाळापर्यंत कितपत काम करणार, हा प्रश्न आहे. मतदार याद्यांपासून ते मतदान केंद्रांपर्यंत आणणे आव्हानात्मक असते. विजय यांच्या नावावर मते जरूर मिळतील मात्र द्रमुक-अण्णा द्रमुक आणि विजय यांचा पक्ष अशा तिरंगी सामन्यांत विधानसभेला प्रत्येक मतदारसंघात तीस टक्क्यांच्या आसपास मते मिळवावी लागतील. त्यांच्या सभांना गर्दी होत असल्याने राज्यातील प्रमुख पक्ष अस्वस्थ आहेत हे मात्र खरे.